गोव्यातील प्रशासन हाताळण्यासाठी सर्वपक्षीय सल्लागार समिती नेमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 04:45 PM2020-03-31T16:45:58+5:302020-03-31T16:46:03+5:30
विजय सरदेसाई: मुख्यमंत्री दबाब हाताळू शकत नसल्याचा दावा
मडगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या दोन आठवड्यातील गोव्यातील एकंदर परिस्थिती पाहिल्यास राज्याचे प्रशासन हाताळण्यासाठी त्वरित सर्वपक्षीय सल्लागार समिती नेमण्याची गरज असल्याचे मत गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली आहे.
या संबंधी जारी केलेल्या एका व्हिडिओत सरदेसाई यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर टीका करताना ज्या गंभीरतेने परिस्थिती हाताळण्याची गरज होती त्या गंभीरतेने ती हाताळली जात नाही. विरोधकांच्या मागणीमुळे आपण मार्केट खुले करतो पण परिस्थिती हाताबाहेर गेल्यास आपण जबाबदार नाही अशा प्रकारचे वक्त्यव्य करून ते आपल्यावरची जबाबदारी ढकलू पाहतात, हे सर्व पाहिल्यास राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री ठोस निर्णय घेऊ शकत नाहीत हे स्पष्ट होते. ही परिस्थिती कशी हाताळावी हे ठरविण्यासाठी मुख्यमंत्री केवळ सत्ताधारी आमदारांचीच बैठक घेतात, ते पाहिल्यास विरोधकांना बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होतो हे स्पष्ट झाले आहे. वास्तविक अशा आणीबाणीच्या वेळी सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घ्यायचा असतो. या सर्व पार्श्वभूमीवर अशी सर्वपक्षीय सल्लागार समिती नेमण्याची नितांत गरज वाटते असे ते म्हणाले.
ही समिती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नेमावी मात्र निर्णय सर्वसमावेशकपणे घेण्यासाठी इतर पक्षांच्या आमदारांचा त्यात समावेश असावा जेणेकरून घेतकेल्या निर्णयाचे उत्तरदायित्व सर्वावर राहील आणि त्यात पक्षपातीपणाही राहणार नाही असे ते म्हणाले.
गोव्यात सगळे आलबेल आहे असे जरी भरविण्यात येत असले तरी खरेच तशी स्थिती आहे का असा सवाल सरदेसाई यांनी केला असून जर उद्या गोव्यात आरोग्य आणीबाणी निर्माण झाली तर ती स्थिती हाताळण्यासाठी आमचे प्रशासन खरंच सक्षम आहे का हेही तपासून पाहण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले.