गोवा डेअरीवर प्रशासक नियुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 10:17 AM2023-04-22T10:17:14+5:302023-04-22T10:17:48+5:30
कथित गैरव्यवहार; सात संचालक अपात्र सहकार निबंधकांची कारवाई
पणजी : गोवा डेअरीतील कथित गैरव्यवहारप्रकरणी डेअरीच्या १२ पैकी ७ संचालकांना गोवा सहकार निबंधकांनी काल अपात्र ठरवले आहे. दरम्यान, नव्या संचालक मंडळाची निवड होईपर्यंत गोवा डेअरीच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी सनदी अधिकारी पराग नगर्सेकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची प्रशासकीय समिती नियुक्ती केली आहे.
गोवा डेअरीमधील कथित ६ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी सहकार निबंधकांकडून ही चौकशी सुरू होती. डेअरीच्या तत्कालीन संचालक मंडळ तसेच व्यवस्थापकीय संचालकांच्या निर्णयामुळे गोवा डेअरीला ६ कोटी रुपयांचे नुकसान महसूल स्वरूपात सोसावे लागले आहे. त्यामुळे यात दोषी आढळून आलेल्या सात संचालकांना अपात्र ठरवले जात असल्याचे सहकार निबंधक विशांत गावणेकर यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.
आपत्र ठरवण्यात आलेल्या संचालकांमध्ये उल्हास सिनारी, राजेश फळदेसाई, विठ्ठोबा देसाई, विजयकांत गावकर, गुरुदास परब व बाबूराव देसाई यांचा समावेश आहे. तर माधव सहकारी हे यापूर्वी संचालक होते. मात्र, त्यांनी आपल्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानुसार माधव सहकारी त्यांनासुद्धा अपात्र ठरवले आहे. गोवा डेअरीतील कथित पशुखाद्य घोटाळ्याप्रकरणी २०२१ पासून सहकार निबंधकांसमोर सुनावणी सुरू होती.
दरम्यान, घोटाळ्याप्रकरणी एकूण कथित १२ संचालकांना नोटीस बजावली होती. यात काही माजी संचालकांचाही समावेश होता. त्यानुसार वरील सहा विद्यमान संचालक व माधव सहकारी ज्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे, त्यांना अपात्र ठरवले आहे. त्यामुळे विद्यमान संचालकांमध्ये सध्या मंडळावर केवळ उदय प्रभू नितीन प्रभुगावकर बाबू फाळू व श्रीकांत नाईक हेच संचालक शिल्लक राहिले आहेत.
हे ठरले अपात्र....
उल्हास सिनारी, राजेश फळदेसाई, विठ्ठोबा देसाई, विजयकांत गावकर, गुरुदास परब व बाबूराव देसाई व माधव सहकारी
समितीत कोण?
सनदी अधिकारी पराग नगर्सेकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीत पशुसंवर्धन खात्याचे पशुचिकित्सक डॉ. रामा परब व लेखा खात्याचे अधिकारी संदीप रामनाथ परब पार्सेकर यांचा समावेश आहे.
हायकोर्टात दाद मागणार
सहकार निंबधकांनी संचालकांना अपात्र ठरण्याचा दिलेला निर्णय हा लोकशाहीचा खून आहे. या निर्णयाविरोधात आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाद मागू, गोवा डेअरीवर हजारो शेतकरी तसेच २५० हून अधिक कर्मचारी अवलंबून आहेत. गोवा डेअरीचा ताबा जेव्हा प्रशासकाकडे होता तेव्हा संचालक मंडळावर आमची नियुक्ती झाली. अशा प्रकारच्या निर्णयामुळे जी अवस्था आज संजिवनी साखर कारखान्याची झाली आहे. तीच गोवा डेअरीची सुध्दा होईल अशी भीती असल्याचे अध्यक्ष राजेश फळदेसाई यांनी व्यक्त केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"