'सनबर्न' ला मान्यता! २८ व ३० पर्यंत पार्टी; लोकांमधील फूट सरकारच्या पथ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2024 11:40 AM2024-12-01T11:40:30+5:302024-12-01T11:40:30+5:30
सनबर्नचे आयोजन कसिनो व्यावसायिक जयदेव मोदी यांच्या कंपनीच्या खूप मोठ्या जागेत केले जाणार आहे
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'सनबर्न'ला विरोध करणाऱ्या धारगळमधील लोकांमध्ये फूट पडली असून त्या फुटीचा लाभ सरकारने घेतल्याचे चित्र समोर आले आहे. सरकारच्या उच्चाधिकार समितीने सनबर्नचे आयोजन धारगळमध्येच करण्यास तत्त्वतः मान्यता दिली आहे. धारगळमध्येच येत्या दि. २८ ते ३० डिसेंबरपर्यंत सनबर्नची अखंड पार्टी (ईडीएम) चालणार आहे.
सनबर्नचे आयोजन कसिनो व्यावसायिक जयदेव मोदी यांच्या कंपनीच्या खूप मोठ्या जागेत केले जाणार आहे. सनबर्न आयोजकांनी जागेच्या वापरासाठी कंपनीची एनओसी प्राप्त केली आहे. अर्जासोबत ती एनओसीही त्यांनी लावली आहे. पर्यटन खात्यानेही तत्त्वतः अर्ज मंजूर केल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. दि. २८ पासून धारगळला इलेक्ट्रोनिक डान्स फेस्टिव्हल सुरू होईल. पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांना 'लोकमत'ने काल याविषयी विचारले असता, त्यांनी माहितीला दुजोरा दिला. धारगळचे स्थळ निश्चित झाल्याचेही ते म्हणाले.
आमदार आर्लेकर यांनी तसेच काही नगरसेवकांनीही सनबर्नविरोधात गेल्या तीन दिवसांत कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. शुक्रवारी पेडण्यात सनबर्न विरोधात मोठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. मात्र, आमदारांसह धारगळचे सरपंच, उपसरपंच व पंचसदस्यही आले नव्हते. धारगळच्या लोकांमध्ये सनबर्नवरून फूट पडल्याची चर्चा पेडण्यातही पसरली आहे. त्यामुळे त्याचा लाभ सनबर्न आयोजकांना झाल्याचेही म्हटले जात आहे.
सनबर्नद्वारे अनेक प्रकारच्या रोजगार संधी टॅक्सी व्यावसायिकांसह इतरांनाही मिळतील, असे सरकारचे म्हणणे आहे. मात्र भारतीय संस्कृतीप्रेमींना सरकारचा हा दावा पटत नाही. सनबर्न धारगळमध्ये करू नये म्हणून पेडण्यातील लोक, आजी-माजी पंच सदस्य, काही नगरसेवक आदींनी अगोदर विरोध केला होता. स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांनीही विरोध केला होता. लोकांना घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता, पण प्रत्यक्षात आता विरोध मावळल्याचे दिसून येत आहे.
तिकीट विक्रीवरुन 'घाट' लक्षात आलेला
स्थळ निश्चित न करताच सनबर्न आयोजकांनी तिकीट विक्री सुरू केलेली. यावरुनच सरकारने सनबर्नला मान्यता देण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते. सत्यता पडताळण्यासाठी मी स्वतः तिकीट खरेदी केले आहे. यावरुन सरकार सामान्यांचा विरोध झुगारून हा महोत्सव करत असल्याची टीका आपचे प्रदेशाध्यक्ष अॅड. अमित पालेकर यांनी केली आहे.
सोमवारी पंचायतीची कसोटी
दरम्यान, उद्या सोमवारी धारगळ पंचायतीची एक प्रकारे कसोटीच लागेल. सोमवारी पंचायतीची पाक्षिक बैठक आहे. सनबर्न आयोजित करायला मान्यता द्यावी की देऊ नये हे पंचायतीकडून ठरविले जाणार आहे. सकाळी १० वाजता पंचायतीसमोर सनबर्न विरोधक जमणार आहेत. लोकही विरोधासाठी जमतील. ग्रामपंचायतीतील मंडळ कोणती भूमिका घेते याकडे पेडणे तालुक्याचे लक्ष लागून आहे. पंचांमध्ये तसेच लोकांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न काहीजणांकडून अजून सुरू आहेत.