बाणावलीत अॅक्वा पार्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2016 02:48 AM2016-05-25T02:48:58+5:302016-05-25T02:49:40+5:30
पणजी : साधनसुविधा विकास महामंडळाची बैठक मंगळवारी होऊन तीन वेगवेगळे प्रकल्प हाती घेण्याचे ठरले. लोलये, पैंगीण येथे
पणजी : साधनसुविधा विकास महामंडळाची बैठक मंगळवारी होऊन तीन वेगवेगळे प्रकल्प हाती घेण्याचे ठरले. लोलये, पैंगीण येथे १0 कोटींचा छोटा पूल, बाणावली येथे अॅक्वा पार्क व राजधानी शहरातील दयानंद बांदोडकर मार्गाचे लँडस्केपिंग असे हे तीन प्रकल्प आहेत. ३00 सरकारी प्राथमिक शाळा व हायस्कूल इमारतींची दुरुस्ती महामंडळाने केली असून प्रसाधनगृहेही बांधली आहेत. त्यावर सुमारे ८0 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. मडगाव, केपे व पेडणे येथील सरकारी महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधा उभारण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. महामंडळाचे अध्यक्ष आमदार प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. लोलये पुलाचा प्रस्ताव सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. बाणावलीचे मत्स्यालय ११ हेक्टर जमिनीत येणार असून सार्वजनिक-खासगी सहभाग तत्त्वावर (पीपीपी) ते बांधले जाईल. पणजीत दयानंद बांदोडकर मार्गावर लँडस्केपिंग करण्यात येणार आहे त्यासाठी महापालिकेक डे ना हरकत दाखला मागितला आहे.
शाळांसाठी नव्या इमारतीही जागतिक दर्जाच्या बांधल्या जात आहेत. कुडणे, कामराभाट (ताळगाव), टोक (कुंभारजुवे) शाळांसाठी बांधलेल्या इमारती आदर्श अशाच आहेत, असा दावा सावंत यांनी केला. शिक्षण खात्याकडून गरजेनुसार शाळांच्या डागडुजीचे प्रस्ताव येतात त्यानुसार आम्ही कामे करतो, असे सावंत म्हणाले. शाळांना फळे, बाकडेही दर्जेदार असेच दिलेले आहेत. एका प्रश्नावर उत्तर देताना सावंत यांनी राज्यात शंभर टक्के शाळांमध्ये प्रसाधनगृहे आहेत, असा दावाही केला.
साखळी, खांडोळा महाविद्यालयांमध्ये अतिरिक्त साधनसुविधा निर्माण करण्याचे काम पूर्ण झाले आहे.
(प्रतिनिधी)