आर्लेकरांना शिक्षण खाते?
By admin | Published: October 2, 2015 02:40 AM2015-10-02T02:40:49+5:302015-10-02T02:41:01+5:30
पणजी : पेडणेचे आमदार राजेंद्र आर्लेकर यांचा गुरुवारी मंत्री म्हणून शपथविधी करण्यात आला व मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील
पणजी : पेडणेचे आमदार राजेंद्र आर्लेकर यांचा गुरुवारी मंत्री म्हणून शपथविधी करण्यात आला व मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील एकमेव रिकामी जागा भरली गेली. आर्लेकर यांनी मराठीतून शपथ घेतली. मंत्री आर्लेकर यांना शिक्षण खाते दिले जाण्याची दाट शक्यता आहे. हे खाते सध्या मुख्यमंत्र्यांकडे आहे. मंत्री रमेश तवडकर यांच्याकडील क्रीडा खातेही आर्लेकर यांना दिले जाऊ शकते.
राजभवनवर सायंकाळी शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी मंत्री आर्लेकर यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. या वेळी मुख्यमंत्र्यांसह संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, आर्लेकर यांचे वडील दादा आर्लेकर, आर्लेकर यांच्या पत्नी तसेच अन्य कुटुंबीय उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा प्रांत संघचालक सुभाष वेलिंगकर,
रत्नाकर लेले, संजय वालावलकर तसेच महाराष्ट्रातील काही संघ कार्यकर्तेही शपथविधी सोहळ्यावेळी उपस्थित राहिले.
मिकी पाशेको यांनी काही महिन्यांपूर्वी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर मंत्रिमंडळातील एक जागा रिकामी झाली होती.
दरम्यान, विरोधी काँग्रेसचे आमदार शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहिले नाहीत.
उपसभापती अनंत शेट, आमदार विष्णू वाघ, प्रमोद सावंत, मंत्री
महादेव नाईक, दीपक ढवळीकर, आवेर्तान फुर्तादो, कार्लुस
आल्मेदा हे शपथविधी सोहळ्याचे साक्षीदार ठरले. (खास प्रतिनिधी)