गोव्याच्या किनाऱ्यावर पर्यटकांचे स्वैर वर्तन, व्हिडीओ व्हायरल, सर्वत्र संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 01:16 PM2020-09-14T13:16:33+5:302020-09-14T13:50:45+5:30
गोव्यात येऊ लागलेले देशी पर्यटक कोविड महामारीच्या मार्गदर्शक तत्वांना हरताळ फासत असल्याचेही चित्र दिसत आहे.
पणजी - आंतरराज्य सीमा खुल्या झाल्याच्या दिवसापासून गोव्यात येऊ लागलेले देशी पर्यटक कोविड महामारीच्या मार्गदर्शक तत्वांना हरताळ फासत असल्याचे चित्र दिसत असतानाच समाज माध्यमावर अशाच पर्यटकांचा भर किनाऱ्यावर सर्व नियम पायदळी तुडवून जीपने सफर करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ वरून स्थानिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
भर किनाऱ्यावर समुद्राचे पाणी तुडवीत पर्यटकांची जीप गाडी धावते आहे. धावत्या जीपगाडीत दोघेजण दरवाजात लटकत आहेत असा हा व्हिडीओ पाहून तळपायाची आग मस्तकाला भिडते, अशा प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. किनाऱ्यावर स्थानिक किंवा पर्यटक अशाने सुरक्षित राहिलेले नाहीत, अशी भावनाही व्यक्त झाली.
प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते तथा कळंगुटचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांनी शिस्तीने वागायला हवे, अशी अपेक्षा असल्याचे ते म्हणाले. महामारी असताना मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन पर्यटकांकडून घडत आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये कोविडचा फैलाव होण्याची भीती फर्नांडिस यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, पोलिस स्थानिकांनी मास्क परिधान केला नाही तर त्यांच्या मागे हात धुऊन लागतात. पर्यटकांच्या बाबतीत मात्र कोणतीही कारवाई केली जात नाही.
रविवारी महापालिकेने येथील मेरी इमेक्युलेट चर्चजवळ विना मास्क घोळका करून उभे राहिलेल्या १५ देशी पर्यटकांना दंड ठोठावला. मिरामार किनारा, दोनापॉल जेटीवर निरीक्षक तैनात करण्यात आले असून अशा पर्यटकांना अद्दल घडवली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी फिरताना तोंडावर मास्क बांधणे, एकमेकांमध्ये किमान सहा फुटांचे अंंतर ठेवत शारीरिक दुरीचे पालन करणे आदी गोष्टी मार्गदर्शक तत्वानुसार बंधनकारक आहेत. परंतु पर्यटक या गोष्टींचे सर्रास उल्लंघन करताना आढळून येत आहेत.
१ सप्टेंबर रोजी आंतरराज्य सीमा खुल्या झाल्या त्यानंतर शेजारी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेशमधून मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक गोव्यात येऊ लागले आहेत. गेल्या सहा महिन्यांच्या काळात पर्यटकांना गोव्यात येता आले नव्हते. आता सीमा खुल्या झाल्यावर देशी पर्यटकांचा ओघ खूप वाढला आहे. परंतु पर्यटकांचे स्वैर वर्तन पाहता नजीकच्या काळात स्थानिकांबरोबर त्यांचा संघर्ष होऊ शकतो,अशी चिन्हे दिसू लागली आहेत.