आर्चबिशपांनी भाषणात मनोहर पर्रीकरांच्या आरोग्याचा उल्लेख टाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 09:59 PM2018-12-28T21:59:16+5:302018-12-28T21:59:30+5:30
आर्चबिशपांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या सरकारचा किंवा त्यांच्या आरोग्याबाबत कोणताच उल्लेख केला नाही, हे अनेकांच्या लक्षात आले.
पणजी : नाताळ सणानिमित्ताने आर्चबिशप फिलिप नेरी फेर्राव यांनी आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यावेळी सरकारमधील जास्त मंत्री उपस्थित राहिले नाहीत. आर्चबिशपांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या सरकारचा किंवा त्यांच्या आरोग्याबाबत कोणताच उल्लेख केला नाही, हे अनेकांच्या लक्षात आले.
दरवर्षी आल्तिनो येथील आर्चबिशप पॅलेसमोरील जागेत नाताळानिमित्ताने अतिमहनीय व्यक्तींसाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले जाते. शुक्रवारी झालेल्या मेळाव्यावेळी आर्चबिशपांनी आपल्या भाषणातून शांततेचा संदेश दिला. नाताळ व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. गरीब आणि समाजाच्या कमकुवत घटकांच्या कल्याणासाठी काम करण्याकरिता चर्च संस्थेने हे वर्ष वाहिले आहे, असे आर्चबिशप म्हणाले. एरव्ही दरवर्षी सरकारविषयी आर्चबिशपांच्या भाषणात काही तरी टिप्पणी असायची. काँग्रेसचे सरकार अधिकारावर असतानाही आर्चबिशप कडक सल्ला द्यायचे. तसेच भाजपाचे सरकार अधिकारावर असतानाही आर्चबिशप योग्य ते डोस द्यायचे. देशातील कलह व अशांततेच्या स्थितीवर तसेच गोव्यातील खनिज खाण बंदीच्या स्थितीवरही एरव्ही आर्चबिशपांचे भाषण भाष्य करत असे पण यावेळी तसा कोणताच उल्लेख केला गेला नाही. आर्चबिशप मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्याचा उल्लेख करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतील असेही काही आमदारांना अपेक्षित होते, पण तसे काही घडले नाही.
प्रथमच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर स्नेहमेळाव्याला उपस्थित राहू शकले नाहीत. राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा व त्यांचे पती तसेच मंत्री सुदिन ढवळीकर, विजय सरदेसाई, रोहन खंवटे, निलेश काब्राल व माविन गुदिन्हो यांनी स्नेहमेळाव्यात भाग घेतला. सभापती डॉ. प्रमोद सावंत, उपसभापती मायकल लोबो, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, लुईङिान फालेरो, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, ग्लेन तिकलो आदींनी स्नेहमेळाव्यात भाग घेतला.