गोव्यात चर्च खुली करण्यास आर्चबिशपांचा हिरवा कंदील
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 09:22 PM2020-06-24T21:22:17+5:302020-06-24T21:23:03+5:30
जुने गोवें येथील ऐतिहासिक बॉ जिझस बासिलिका चर्चसह गोव्यातील अनेक चर्च देश, विदेशी भाविकांचे श्रध्दास्थान आहे. परंतु सध्या लॉकडाऊनमुळे भाविक दर्शन घेऊ शकलेले नाहीत.
पणजी : मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करुन राज्यातील चर्च, कपेल भाविकांसाठी खुली करण्यास आर्चबिशपनी परवानगी दिली आहे. त्यामुळे आता चर्च हळूहळू खुले होतील. मात्र कटेंनमेंट झोनमधील चर्च उघडण्यास मान्यता नाही. जुने गोवें येथील ऐतिहासिक बॉ जिझस बासिलिका चर्चसह गोव्यातील अनेक चर्च देश, विदेशी भाविकांचे श्रध्दास्थान आहे. परंतु सध्या लॉकडाऊनमुळे भाविक दर्शन घेऊ शकलेले नाहीत.
आर्चडायोसिस ऑफ गोवा दमण अॅण्ड दीव या चर्च संस्थेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटल्यानुसार चर्चमध्ये उभे राहताना किंवा बाकड्यांवर बसतानाही ६ फुटांचे शारीरिक अंतर ठेवावे लागेल. मास्कचा कटाक्षाने वापर करावा लागेल. सॅनिटायझेशन तसेच अन्य गोष्टींचे मार्गदर्शक तत्त्वांनुसार पालन करावे लागेल. हाताचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी हॅण्ड सॅनिटायझर वापरावा लागेल.
पवित्र जल दिले जाणार नाही तसेच ग्रंथ किंवा पत्रके यांचा वापर केला जाणार नाही. चर्च किंवा कपेलाच्या आवारातही स्वच्छता ठेवावी लागेल. ६५ वर्षे वयापेक्षा अधिक आणि १0 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तसेच कोविडची लक्षणे दाखवणा-यांना चर्चमध्ये येणे टाळावे कारण या वयाच्या व्यक्ती ‘कोविड’ साठी संवेदनशील आहेत.
या उपाययोजना केल्या आहेत का याची खातरजमा करण्यासाठी चर्चच्या धर्मगुरुंनी ४ ते ८ जणांचे पथक स्थापन करावे. चर्च संस्थेने नेमलेले खास पथक सर्व उपाययोजनांची पाहणी करील, असे आर्चबिशप फिलिप नेरी फेर्रांव यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्त्वे घालून गेल्या ८ जूनपासून धार्मिक स्थळे खुली करण्याची परवानगी दिली होती. परंतु गोव्यातील चर्च खुल्या झाल्या नव्हत्या.