पुराभिलेख खात्याकडून सर्व संग्रहीत कागदपत्रांचे होणार डिजिटलायझेशन- मंत्री फळदेसाई
By पूजा प्रभूगावकर | Published: December 1, 2023 01:29 PM2023-12-01T13:29:13+5:302023-12-01T13:29:20+5:30
संग्रहीत दस्तऐवजांची छेडछाड राेखण्यासाठी आता सीसीटीव्हीवर नजर
पणजी: संग्रहीत केलेल्या दस्तऐवजांची छेडछाड राेखण्यासाठी त्यावर आता सीसीटीव्हीव्दारे देखरेख ठेवली जाईल. त्यानुसार पुराभिलेख खात्याने हे सीसीटीव्ही कॅमरा बसवले असल्याचे खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.
संग्रहीत केलेल्या दस्ताएवजांचे लवकरच डिजिटलायझेशन केले जाईल.त्यासंबंधीची फाईल मंजुरीसाठी सरकारकडे पाठवली आहे. यामुळे सर्व दस्ताएवजांचा रेकॉर्ड राहील. सदर दस्ताएवज कुणी मागितला, किती वेळा मागितला ,कधी मागितला , तो कुणी मंजुर केला याचा रेकॉर्ड यामुळे सहज उपलब्ध होईल असेही त्यांनी सांगितले.
पुराभिलेख खात्याकडे असलेले दस्ताएवज हे ३०० ते ४०० तर काही त्याहून अधिक वर्ष जुने आहेत. त्यामुळे त्यांचे संरक्षण व संवर्धन होणे गरजेचे आहे. पावसाळ्यात मळा येथील कार्यालयातील पहिल्या मजल्यावर पाणी भरते. त्यामुळे बरीच अडचण होते. त्यामुळे आता सदर कार्यालय हे अन्यत्र हलवले असून आल्तीनो येथे खात्याची प्रशस्त अशी इमारत व्हावी यासाठी प्रयत्न आहे. सरकारने त्यासाठी सहकार्य करावे असेही फळदेसाई त्यांनी नमूद केले.