गोव्यात चर्च संस्था आणि राजकारण्यांमध्ये कलगीतुरा 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 11:50 AM2018-04-30T11:50:51+5:302018-04-30T11:50:51+5:30

कथित बेकायदा भूरुपांतरांचा वाद ऐरणीवर : चौकशी समिती नेमणार 

Argumemt between The church institutions and politicians in Goa | गोव्यात चर्च संस्था आणि राजकारण्यांमध्ये कलगीतुरा 

गोव्यात चर्च संस्था आणि राजकारण्यांमध्ये कलगीतुरा 

Next

पणजी : बेकायदा भू-रुपांतराच्या प्रश्नावरुन गोव्यात चर्च संस्था आणि राजकारणी यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. ‘गोंयचो आवाज’ संघटनेच्या व्यासपीठावरुन १४ आजी-आमदार, मंत्र्यांवर बेकायदा भू-रुपांतराचे आरोप चर्चने केल्याच्या पार्श्वभूमीवर राजकारण्यांनीही आता या संघटनेला माफी न मागितल्यास कोर्टात खेचण्याचा इशारा दिला आहे. तर सरकारी पातळीवर या आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात येणार आहे. नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांना विचारले असता चौकशी समिती नेमण्याचा सरकारचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. समिती स्थापन करताना चर्चला विश्वासात घेणार का, या प्रश्नावर ते म्हणाले की, नियोजन हा तांत्रिकी विषय असल्याने समितीवरही तशाच पद्धतीचे तज्ज्ञ असतील. त्याबाबत तडजोड करुन चालणार नाही आणि कोणाला विश्वासात घेण्याचा प्रश्न नाही. चर्च संस्थेने केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर काही राजकारण्यांनी अब्रु नुकसानी खटले दाखल करण्याच्या हालचाली चालवल्या आहेत. चर्चने केले आरोप खरे की बिनबुडाचे हेही स्पष्ट व्हायला हवे. दुस-याबाजूने चर्चवरही आरोप होत आहेत, हेही लक्षात घ्यायला हवे. 

शुक्रवारी मडगाव येथे झालेल्या जाहीर सभेत ‘गोंयचो आवाज’ संघटनेने राजकारण्यांवर हल्लाबोल केल्यानंतर आता चर्च संस्थेवरही आरोप होऊ लागले आहेत. तब्बल ५ लाख चौरस मीटर भूरुपांतराची मागणी पूर्ण न झाल्यानेच चर्चचा पीडीए, प्रादेशिक आराखड्याला विरोध होत असल्याचा आरोप आहे. अशी माहिती पुढे येत आहे की, नगर नियोजन मंडळाकडे तब्बल २१ अर्ज चर्च संस्थेने भूरुपांतरांसाठी केले होते. त्यातील काही अर्ज फेटाळण्यात आले. कौन्सिल फॉर सोशल जस्टिस अ‍ॅण्ड पीस या चर्च संघटनेचे फादर सावियो फर्नांडिस यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. फादर सावियो म्हणाले की, ‘ चर्चने घाऊक भूरुपांतरांसाठी अर्ज केले होते हे मी तुमच्या तोंडून प्रथमच ऐकतोय. या आरोपांमध्ये तथ्य नाही. पीडीएविरोधी चळवळ लोकांनी सुरु केली त्याला चर्चने केवळ पाठिंबा दिलेला आहे. कळंगुट, कांदोळी, सांताक्रुझ, सांत आंद्रेमधून लोक आमच्याकडे येऊ लागले त्यामुळे चर्चला भूमिका घ्यावी लागली.’ 

माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार दिगंबर कामत म्हणाले की, ‘मी कोणतेही गैर काम केलेले नाही. त्यामुळे मला कोणत्याही गोष्टीची भीती नाही. जी काही वस्तुस्थिती आहे ती मी पत्रकारांसमोर मांडलेली आहे’. हळदोणेचे आमदार ग्लेन टिकेलो म्हणाले की, ‘२०२१ आराखड्याच्या मसुद्यावेळी मी अर्ज केला होता; परंतु कोणतेही भूरूपांतर झालेले नाही. ४८ तासांच्या आत संघटनेने लेखी माफी न मागितल्यास खटला घालीन.’ नुवेचे आमदार विल्फ्रेड डिसा यांनी पुरावे द्या, असे आव्हान देताना आपले घर ७० ते ८० वर्षांचे व पूर्वजांची मान्यता असल्याचे सांगितले. एक इंचही जमीन रूपांतरित केल्याचे दाखवल्यास आमदारकी सोडीन, असे त्यांनी म्हटले आहे. माजी मंत्री ज्योकीम आलेमाव यांनी भूरूपांतराचे आरोप फेटाळून लावले. माजी आमदार जितेंद्र देशप्रभू म्हणाले की त्यांची ५०० एकरपेक्षा जास्त जमीन आहे. त्यातील केवळ ४० एकर जमीन १९९४-९५ मध्ये सर्व सोपस्कार पूर्ण करून रूपांतरित केली आहे. ते म्हणाले की ‘कोणतीही बेकायदा गोष्ट मी केलेली नाही.’ आमदार लुईझिन फालेरो यांनी आरोपकर्त्या संघटनेचा काही तरी गैरसमज झाल्याचे म्हटले असून आधी संघटनेने नीट माहिती करून घ्यावी आणि नंतरच बोलावे असे म्हटले आहे.

दरम्यान, चर्चविरोधात सोशल मीडियावरुन निनावी व्हिडीओ क्लिप्स फिरत असून फादर सावियो फर्नांडिस यांनी याचा निषेध केला आहे. या व्हिडीओ क्लिपमधून चर्चच्या धोरणांवर हल्ला चढविण्यात आला आहे. कोकण रेल्वे तसेच अन्य प्रकल्पांना वेळोवेळी झालेला विरोध तसेच आता पीडीएंना चर्चकडून होत असलेला विरोध यावर टीका करण्यात आली आहे. 

Web Title: Argumemt between The church institutions and politicians in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.