स्मशानभूमीवरून वाद, गुडी पारोडाच्या दोनशे ग्रामस्थांनी गाठले पोलीस ठाणे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 05:04 PM2023-12-17T17:04:51+5:302023-12-17T17:05:02+5:30
चारही गावातील लोकांच्या वापरातील या समशानभूमीचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून गाजत आहे.
ख्रिस्तानंद पेडणेकर
केपे : स्मशानभूमीची जमीन आमची आहे. जर कोणी आमच्या जमिनीवर हक्क सांगून अत्याचार करू पाहात असेल तर त्याच्याविरोधात न्यायालयात जायला मागे राहणार नाही, असा इशारा गुडी पारोडा येथील ग्रामस्थांनी दिला. पंचायत क्षेत्रातील स्मशानभूमीच्या जमिनीवरून रविवारी वाद उफाळला. जीमी रॉड्रिग्स यांनी ग्रामपंचायतीच्या पंच सदस्य राजश्री गावकर यांच्याविरोधात तक्रार केल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. सुमारे दोनशे लोकांनी बसमधून केपे पोलिस स्थानकावर धडक दिली. त्यामुळे वातावरण तापले. गुडी पारोडा पंचायत क्षेत्रातील ही स्मशानभूमी गुडी, जरीवाडो, तळेवाडी, कार्यागाळ या चार ठिकाणच्या लोकांसाठी वापरली जाते.
चारही गावातील लोकांच्या वापरातील या समशानभूमीचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून गाजत आहे. स्मशानभूमीच्या जागेमथून जाणारी पायवाट हे या वादाचे मुख्य कारण आहे. अलिकडे हा वाद वारंवार उपस्थित होतो आहे. गुडी पारोडा पंचायत क्षेत्रातील गावकऱ्यांनी स्मशानभूमीभोवती सिमेंटचे पोल उभे केले. मात्र, काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी सर्व पोल काढून टाकले. त्यामुळे हा मुद्दा यापूर्वीच तापला होता. त्यातच रॉड्रिग्स यांनी पंच राजश्री गावकर यांच्याविरोधात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी पंच गावकर यांना पोलिस ठाण्यात बोलावले. त्यामुळे ग्रामस्थ आक्रम झाले.
रविवारी केपे पोलिस स्थानकाबाहेर वातावरण तापले होते. ग्रामस्थांनी पोलिसांना सांगितले की, ज्या जमिनीमुळे हा वाद निर्माण झाला आहे, त्या स्मशानभूमीवर चार गावांचा हक्क आहे. ती कोणाचीही खासगी मालकीची नाही. अनुसूचित जमातीशी संबंधीत लोकांकडून ही स्मशानभूमी वापरली जाते. याप्रश्न गरज भासल्यास आम्ही कायद्याची लढाई लढू असा इशारा वकील उपासो गावकर यांनी दिला. अंत्यसंस्कारास आडकाठी आणणाऱ्यांविरोधात अनुसूचित जमातीवर अत्याचारासंदर्भात तक्रार आम्ही न्यायालयात दाखल करू, असे त्यांनी सांगितले. पंच गावकर यांनी सांगितले, की, चार ठिकाणच्या लोकांसाठी या स्मशानभूमीचा वापर होतो. मात्र, त्याच्या वापरात आडकाठी आणली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी ग्रामस्थांची समजूत काढली.