खंडणी मागून मिळवलेला पैसा लष्कराला नको, उद्धव यांचा राजना टोला
By admin | Published: October 23, 2016 01:02 PM2016-10-23T13:02:38+5:302016-10-23T13:02:38+5:30
'ऐ दिल है मुश्किल'च्या वादावरून उद्धव ठाकरे यांनी मनसेसह राज ठाकरेंना जोरदार चपराक लगावली आहे.
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 23 - 'ऐ दिल है मुश्किल'च्या वादावरून उद्धव ठाकरे यांनी मनसेसह राज ठाकरेंना जोरदार चपराक लगावली आहे. "खंडणी मागून मिळवलेला पैसा लष्कराला नको असला पाहिजे. लष्कराला स्वतःचा स्वाभिमान आहे", असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.
तर कालच पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या भूमिकेमूळे वादात सापडलेला "ऐ दिल है मुश्कील" चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मार्गातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अडथळ दूर झाला. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर काही अटींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या चित्रपटाच्या विरोधाची तलवार म्यान केली. चित्रपटाला नफा वा तोटा झाला, तरी निर्माते सैनिक कल्याण निधीमध्ये पाच कोटी रुपये देतील. पाक कलाकार असलेल्या चित्रपटांच्या निर्मात्यांनी प्रत्येकी पाच कोटी रुपये सैनिक कल्याण निधीला द्यावेत, असे राज म्हणाले होते. या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना खंडणीचा पैसा नको म्हणत शरसंधान साधलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, "गोव्याकडे आजवर शिवसेनेचे दुर्लक्ष झाले. मात्र यापुढे चांगल्या माणसांना सोबत घेऊन आम्ही गोव्याचे राजकारण करणार आहोत". तसेच सुभाष वेलिंगकर यांच्यासोबत शिवसेना पुढील वाटचाल करणार असल्याचे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोव्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वेलिंगकरांसोबत युती करण्याचे स्पष्ट संकेत दिले.
उद्धव ठाकरे म्हणाले, "मराठी माझी माय आणि कोकणी माझी मावशी आहे. शिवसेना यापुढे केवळ निवडणुकांपूरतीच गोव्यात येणार नाही. आताही शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी मी येथे आलोय. येथील चांगल्या माणसांना सोबत घेऊन आम्ही गोव्यात पुढे जाणार आहोत. सुभाष वेलिंगकर यांच्याशी शनिवारी चर्चा झाली. शिवसेना त्यांच्यासोबत पुढील वाटचाल करणार आहे. मात्र जागावाटपावबाबत दिवाळीनंतर बैठकीत चर्चा होईल.
यावेळी गोव्यातील सत्ताधारी भाजपालाही शिवसेना पक्षप्रमुखांनी फटकारले. समान विचारांची माणसे गोव्यात असल्याने त्यांच्या कामात आडकाठी नको म्हणून आम्ही गोव्यातील राजकारणापासून दूर होतो. पण गोव्यातील जनतेमध्ये सत्ताधाऱ्यांबाबत नाराजी आहे. मातृभाषेचा प्रश्न हा अस्तित्वाचा प्रश्न आहे. असे ठाकरे म्हणाले. तसेच महाराष्ट्राबाहेर शिवसेना आणि भाजपा नेहमीच स्वतंत्रपणे निवडणुका लढवत आली आहे. गोव्यात शिवसेना-भाजपा युती नसल्याने युती तुटण्याचा प्रश्नच येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.