गोव्याचे किनारे ठरताहेत जीवघेणे; महिनाभरात ७१ पर्यटकांना वाचविले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 08:33 PM2018-10-28T20:33:51+5:302018-10-28T20:34:06+5:30
गोव्याचे किनारे पर्यटकांना भूरळ घालणारे असले तरी तेवढेच धोकादायकही आहेत याची प्रचिती वेळोवेळी आलेली आहे. समुद्रात उतरण्याचा मोह अनावर होतो आणि पर्यटक नंतर संकटात सापडतात.
पणजी : गोव्याचे किनारे पर्यटकांना भूरळ घालणारे असले तरी तेवढेच धोकादायकही आहेत याची प्रचिती वेळोवेळी आलेली आहे. समुद्रात उतरण्याचा मोह अनावर होतो आणि पर्यटक नंतर संकटात सापडतात. चालू आॅक्टोबर महिन्यातच दृष्टी लाइफ सेविंगच्या जीवरक्षकांनी ७१ पर्यटकांना वेगवेगळ्या किना-यांवर बुडताना वाचविले यात ९ विदेशी नागरिकांचा समावेश आहे.
मोरजी किना-यावर गुरुवारी २५ रोजी तीन रशियन पर्यटकांना बुडताना वाचविण्यात आले. ४ आॅक्टोबर रोजी गोव्याचा पर्यटक मोसम सुरु झालेला आहे. चार्टर विमानेही येऊ लागली आहेत. गोव्याला भेट देणाºया विदेशींमध्ये रशियन पर्यटकांची संख्या जास्त आहे. २५ रोजी कळंगुट किनाºयावर अन्य एका घटनेत कर्नाटकच्या तीन पर्यटकांना बुडताना वाचविण्यात आले. बागा, कांदोळी, हरमल तसेच अन्य किना-यांवरही पर्यटकांना बुडताना वाचविण्यात आले.
दृष्टी लाइफ सेव्हिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शंकर म्हणाले की, ‘खराब हवामान असल्यास पुरेसे सतर्कतेचे इशारे आम्ही देत असतो. कंपनीचे जीवरक्षक चांगली सेवा देत असतात. मुंबई अग्निशामक दलानेही या कंपनीचा किनारा सुरक्षेसाठी सहयोग घेतलेला आहे. गोव्यातील किनाºयांवर कंपनीचे सुमारे ६00 जीवरक्षक तैनात करण्यात आलेले आहेत. याशिवाय दुधसागर, मयें तलाव यासारख्या ठिकाणीही जीवरक्षक तैनात केलेले आहेत. २00८ पासून ही कंपनी गोव्यात सेवा देत आहे. गेल्या जानेवारी ते आॅक्टोबर या कालावधीत एकूण २१७ पर्यटकांना बुडताना वाचविण्यात आले. यात ४६ विदेशींचा समावेश आहे. सुरवातीपासून आतापर्यंत ३ हजारहून अधिकांचे प्राण जीवरक्षकांनी वाचविले आहेत.’
गोव्यात किना-यांवर बुडून मरण पावणा-यांचे प्रमाण ९९ टक्क्यांनी घटले असल्याचा दावा त्यांनी केला.