एटीएममधून पैसे पळविणाऱ्या चौकडीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2017 02:52 AM2017-05-19T02:52:11+5:302017-05-19T02:53:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्कमडगाव : एटीएममधून कुंकळ्ळी येथील एकाच्या खात्यातील २0 हजार रुपये काढणाऱ्या चौकडीला कुंकळ्ळी पोलिसांनी अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मडगाव : एटीएममधून कुंकळ्ळी येथील एकाच्या खात्यातील २0 हजार रुपये काढणाऱ्या चौकडीला कुंकळ्ळी पोलिसांनी अटक केली आहे. संशयितांपैकी तिघेजण मूळ मुंबईचे, तर एकटा उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील आहे. गोव्यात ते सहलीसाठी आले होते. इरफान खान (२७), लायक अली खान (२१), शफद अली (३९) व अजितेश कुमार (२९) अशी संशयितांची नावे आहेत. यातील अजितेश वगळता अन्य संशयित मुंबई येथील आहेत. भादंसंच्या ४२0 कलमाअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंद केल्याची माहिती कुंकळ्ळी पोलिसांनी दिली. फ्रेडी जुझे फर्नांडिस (३७) हे तक्रारदार आहेत.
बुधवारी दुपारी ही घटना घडली. पांझरकणी-कुंकळ्ळी येथील फ्रेडी हे पैसे काढण्यासाठी दांडेवाडी-कुंकळ्ळी येथील कॉर्पोरेशन बँकेच्या एटीएम कार्ड केंद्रात गेले होते. कार्ड मशिनमध्ये घालून त्यांनी पिनकोड क्रमांक टाकला. मात्र, रक्कम मशिनमधून येत नसल्याने ते माघारी फिरकले. याचवेळी या एटीएम केंद्रात संशयितही आले होते. फे्रडी हे या केंद्रातून बाहेर गेले खरे; मात्र त्यांच्या एटीएम कार्डसंबंधीची प्रक्रिया मशिनमध्ये सुरूच होती. मशिनमधून दहा हजार बाहेर आल्यानंतर संशयितांनी ते काढून आपल्याकडे ठेवले. काही वेळाने फे्रडी यांना मोबाईलवरून दहा हजार रक्कम खात्यातून वजा झाल्याचा मेसेज आला.
फे्रडी हे नंतर बँक आॅफ बडोदा शाखेच्या एटीएम कार्ड केंद्रात गेले. संशयितही त्याच्या पाठोपाठ तेथे पोहोचले. तेथेही फ्रेडी यांना हाच अनुभव आला. संशयाची पाल मनात चुकचुकल्याने फ्रेडी यांनी संशयितांच्या कारचा क्रमांक टिपून घेतला. नंतर कुंकळ्ळी पोलीस ठाण्यात तक्रार केली. बिनतारी संदेश यंत्रणेच्या माध्यमातून पोलिसांना कारचा नंबर पाठवून दिला असता, काणकोण येथे ही कार पोलिसांना सापडली. संशयितांना ताब्यात घेऊन नंतर कुंकळ्ळी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. नंतर कुंकळ्ळी पोलिसांनी या संशयितांना अटक केली. पुढील पोलीस तपास चालू आहे.