अर्सेला पार्सेकर मृत्यू प्रकरण : ‘त्या’ उपनिरीक्षकाविरुद्ध कारवाई करण्याची मृत तरुणीच्या कुटुंबीयांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 08:11 PM2018-02-23T20:11:39+5:302018-02-23T20:11:39+5:30
गेल्या महिन्यात घडलेल्या महिला पोलीस शिपाई अर्सेला पार्सेकर मृत्यू प्रकरण गुन्हा अन्वेशन शाखेकडे सुपूर्द केले असले तरी त्यातील तपासात अजिबात प्रगती नाही. या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या संबंधित पोलीस उपनिरीक्षकास अटक व्हावी आणि त्याला निलंबित करावे, अशी मागणी...
पणजी - गेल्या महिन्यात घडलेल्या महिला पोलीस शिपाई अर्सेला पार्सेकर मृत्यू प्रकरण गुन्हा अन्वेशन शाखेकडे सुपूर्द केले असले तरी त्यातील तपासात अजिबात प्रगती नाही. अर्सेलाने आत्महत्त्या केली नसून, तिला आत्महत्येस प्रवृत्त केले आहे. या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या संबंधित पोलीस उपनिरीक्षकास अटक व्हावी आणि त्याला निलंबित करावे, अशी मागणी तिच्या कुटुंबाने शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
या परिषदेस अर्सेलाची आई क्रिशिदा पार्सेकर, आजी इंदुमती कलंगुटकर, बहीण विणा पार्सेकर नाईक, विंकिता पार्सेकर आणि भावजय जयंती पार्सेकर यांची उपस्थिती होती. विणा पार्सेकर-नाईक म्हणाल्या की, आमच्या कुटुंबात आम्ही चार बहिणी, सर्व कुटुंबात अर्सेला हीच सरकारी खात्यात कामाला असल्याने कुटुंब तिच्यावर अवलंबून होते. 20 वर्षीय अर्सेला पोलीस खात्यात कामाला लागली त्याचे सर्वाना कौतुक होते. वेर्णा पोलीस स्थानकातील पोलीस उपनिरीक्षकाशी ती बराचवेळ मोबाईलवर बोलत असे, त्यातून तिचे त्याच्याबरोबर प्रेम असल्याचे समजले. तिचा लैंगिक छळही झाला असेही त्यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की, जानेवारीच्या 28 तारखेला तिच्या वाढदिवसाला सर्वजण आले, त्यानंतर ही पार्टी दुस-या दिवशी उशिरार्पयत चालू होती. दि. 30 रोजी तिला पोटात त्रस होऊ लागल्याने गोमेकॉमध्ये दाखल केले. त्यानंतर अर्सेलाच्या झालेल्या मृत्यूनंतर शवविच्छेदनात तिच्या पोटामध्ये विष गेल्याचे आढळले. यावरून तिला कोणीतरी आत्महत्येस प्रवृत्त केले असावे, कारण ती असे कृत्य करणारी मुलगी नव्हतीच. जरी पोलिसांनी हे प्रकरण अधिक तपासासाठी दि. 1क् फेब्रुवारी रोजी गुन्हा अन्वेशन शाखेकडे वर्ग केले असले तरी अद्याप या तपासात कोणतीही प्रगती नाही. आम्ही या शाखेतील पोलिसांना विचारणा केली असता, जाबजबाब चालले आहेत, असे सांगितले जाते. यावरून अर्सेलाला न्याय मिळणार नाही, असेच दिसते.
या प्रकरणातील सत्य बाहेर यावे, अशी आमची मागणी आहे. आम्ही तक्रारीत वेर्णाच्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव दिले असूनही त्याच्यावर कोणतीही अद्याप कारवाई झालेली नाही. या पोलीस उपनिरीक्षकाशी तिचे प्रेम असल्याने त्यांच्यात शारीरीक संबंधही आला असावा. त्यानंतर त्याने तिला विवाहास नकार दिला असावा. त्यातूनच तिला त्याने आत्महत्येस प्रवृत्त केले असावे,असा संशय कुटुंबाचा आहे. याप्रसंगी अर्सेलाची आई आणि आजीने आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी केली.