गोव्यातील लोकोत्सवात नव्या रूपात कलाविष्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 09:03 PM2018-01-18T21:03:04+5:302018-01-18T21:04:01+5:30
गोव्यातील जुन्या परंपरेला नवा साज दिलेली कला सध्या लोकोत्सवात पाहायला मिळत आहे. लोकोत्सवामधील वेगवेगळ््या दोन महिला हस्तकारागिरांचे स्टॉल्स सध्या आकर्षण बनत आहे. एका दालनावर पोफळीच्या झाडाच्या 'पोवली' पासून आकर्षक असे लॅम्प्स तयार करून ते मांडण्यात आले आहे.
पणजी - गोव्यातील जुन्या परंपरेला नवा साज दिलेली कला सध्या लोकोत्सवात पाहायला मिळत आहे. लोकोत्सवामधील वेगवेगळ््या दोन महिला हस्तकारागिरांचे स्टॉल्स सध्या आकर्षण बनत आहे. एका दालनावर पोफळीच्या झाडाच्या 'पोवली' पासून आकर्षक असे लॅम्प्स तयार करून ते मांडण्यात आले आहे. तर दुस-या दालनावर 'नवें' म्हणजेच भाताच्या कणसापासून तयार केलेले 'झेले' तोरण आकर्षण ठरत आहे.
संबंध लोकोत्सवात ही गोमंतकीय कलाकारांची दोन दालने वेगळे काही तरी घेऊन आली आहेत. पणजी येथील एका महिला कलाकाराने (आपले नाव न देण्याच्या अटीवर) सांगितले की, हे पोफळीच्या पानाच्या पोवल्यांपासून बनविलेले लॅम्प मी सुरूवातीला स्वत:च्या घरासाठी बनविले होते. व नंतर जेव्हा आपल्या दुकानावर ते लावले होते तेव्हा लोकांना ते आवडायला लागले यामुळे गेल्या दोन वर्षापासून हे हस्तकारागिरी असलेले लॅम्प तयार करत आहे व पहिल्यांदाच गोमंतकीय ग्राहकांसाठी ते उपलब्ध केले आहे. यासाठी कर्नाटकातून पोवल्या आणल्या जातात. त्रिकोणी आकाराचे हे लॅम्प २५० तर मोठ्या आकाराचे ७५० रूपये अशा दरात उपलब्ध आहेत. या पोवल्यांवर सुंदर नक्षिकाम करून ते तयार केले आहेत. तसेच त्यांच्यावर रंग करण्यात आला आहे. १ लॅम्प तयार करण्यासाठी आठवडाभर प्रक्रिया करावी लागत असल्याचे त्या महिला कलाकाराने सांगितले.
दुस-या एका दालनावर शिरोडा येथील मैथीली शिरोडकर (२३) या युवा हस्तकारागिर कलाकाराने गोव्यातील लुप्त होत चाललेल्या भातांच्या कणसांचे तोरण व झेले (पॅडी आर्ट) यांना नविन साज देऊन ते लोकोत्सवाच्या दालनात मांडले आहेत. गांवामध्ये जेव्हा नवीन कणस यायचे तेव्हा नवे म्हणून ते झेले व तोरण तयार करून घरांमध्ये लावले जायचे. मात्र हळुहळु ही कला व परंपरा लुप्त होण्याच्या मार्गावर असल्याचे मैथिली हीने सांगितले.
शिवजयंतीसाठी फार्मागुडी येथे असे भाताच्या कणसांचे तोरण लावलेले आपले बाबा प्रदिप शिरोडकर यांनी बघितले व नंतर त्या कलाकाराचा पत्ता शोधून मडकई येथे जाऊन त्यांच्याकडून ती कला आत्मसात करून घेतली. व बाबांकडून मी ही कला आत्मसात केली असे मैथीली हीने सांगितले.
इफ्फीच्या वेळी ईएसजी संकुलातील मॅकनीझ पॅलेसकडे हे तोरण लावले होते तेव्हा लोकांकडून प्रशंसा झाली व ती कला पूढे नेण्याचे ठरविले असे तीने सांगितले. शाळेत शिकत असतानाच मला हस्तकारागिरीची आवड होती. त्यात बाबांचे सतत प्रोत्साहन मिळाले. सध्या एमएचे शिक्षण घेता घेता ही कला सुरू ठेवली आहे.
यासाठी सावंतवाडीतून भाताची कणसे आणली जातात. व ती स्वच्छ करून टप्प्या टप्प्यांवर प्रक्रिया सुरू होते. एक झेलो करण्यासाठी अर्धाताप पुरे. तर झेलो करण्यासाठी ३ तास लागतात. झेलो ३५० ते ८०० रूपया पर्यंत तर तोरण ५०० ते १५०० रूपयांपर्यंत उपलब्ध आहे.
ही कला नवीन पीढीपर्यंत पोहोचवण्याकरीता शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन कार्यशाळा घेते तसेच घरात या तोरण व झेल्यांसाठी आॅर्डर्स येतात असे मैथीली हीने सांगितले. गोव्यातील ही कला लुप्त होऊ न देता ती पुढे न्यायची आहे असे त्या सांगतात.