कला अकादमीसाठी कलाकारांचे 'गाऱ्हाणे', एक महिन्याच्या आत श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी
By समीर नाईक | Published: July 2, 2024 05:43 PM2024-07-02T17:43:44+5:302024-07-02T17:44:01+5:30
मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून मामलेदार घटनास्थळी आल्याने थेट त्यांच्याकडे कलाकारांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
पणजी : कला अकादमीला भ्रष्टाचाराचा बळी होण्यापासून वाचविण्यासाठी राज्यातील कलाकारांनी मंगळवारी ‘कला राखण मांड’ या बॅनर अंतर्गत कला अकादमी बाहेर थेट गाऱ्हाणे घातले आहे. यावेळी एका महिन्याच्या आत कला अकादमी संदर्भात श्वेतपत्रिका जारी करावी, तसेच मुख्यमंत्र्यांनी कला व संस्कृती मंत्री व कलाकारांसोबत संयुक्त बैठक घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही कलाकारांनी दिला आहे.
यावेळी कलाकार राजदीप नाईक, देविदास आमोणकर, सिसिल रॉड्रीग्स, प्रकाश नाईक, ज्येष्ठ पत्रकार संदेश प्रभुदेसाई व इतर मान्यवर उपस्थित होते. यादरम्यान या कलाकारांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी कला अकादमीच्या बाहेरच तिसवाडीचे मामलेदार यांना कला अकादमी संदर्भात असलेल्या आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून मामलेदार घटनास्थळी आल्याने थेट त्यांच्याकडे कलाकारांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यांनी हे निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासनही दिले आहे. कला अकादमीबाबत श्वेतपत्रिका जारी करणे, कला अकादमीच्या वाईट स्थितीवर अभ्यास करण्यासाठी समिती नेमणे, अकादमीच्या तांत्रिक गोष्टींची पाहणी करणे, मुख्यमंत्र्यांनी कला व संस्कृती मंत्री आणि कलाकारांसोबत संयुक्त बैठक आयोजित करणे या प्रमुख मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत, असे सिसिल रॉड्रीग्स यांनी सांगितले.
कला अकादमी भ्रष्टाचाराला बळी पडली आहे. गेली तीन वर्षे कला अकादमी नूतनीकरणासाठी बंद होती. परंतु, जेव्हा खुली करण्यात आली, तेव्हा अकादमीची स्थिती पूर्वीपेक्षा अधिक बिकट होती. मुख्य नाट्यगृहात गळती लागणे, साऊंड सिस्टम खराब होणे, प्रेक्षकांच्या बसण्याचे आसन देखील निकृष्ट दर्जाचे असणे, या सर्व गोष्टी कला अकादमीत दिसून आल्या. त्यामुळे कला अकादमीची संयुक्त पाहणी होणे गरजेचे बनले आहे. कला अकादमीचा विषय हा काही मो जक्याच कलाकारांपर्यंत मर्यादित न ठेवता राज्यभरातील कलाकारांपर्यंत हा विषय पोहोचविण्यावर आमचा भर असणार आहे, असे देविदास आमोणकर यांनी यावेळी सांगितले.