'ईडी'चे समन्स चुकवत अरविंद केजरीवाल गोव्यात; लोकसभा निवडणूक तयारीचा घेणार आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2024 08:08 AM2024-01-19T08:08:15+5:302024-01-19T08:09:29+5:30
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दिल्लीतील मद्य घोटाळाप्रकरणी ईडीने बजावलेले चौथे समन्स चुकवीत आम आदमी पक्षाचे सर्वसर्वा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काल, गुरुवारी सायंकाळी गोव्यात दाखल झाले. त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान - हेही गोव्यात आले आहेत.
सायंकाळी मोपा विमानतळावर दोघांचे आगमन झाले. ईडीच्या समन्सबद्दल पत्रकारांनी विचारले असता भगवंतसिंग मान म्हणाले की, ईडीला आपले काम करू दे, आम्ही आमचे काम करतोय.
ईडीने केजरीवाल यांना आज १८ रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्स बजावले होते. यापूर्वी तीन समन्सकडे केजरीवाल यांनी असेच दुर्लक्ष केले. समन्स बेकायदेशीर असल्याचा त्यांचा दावा आहे. २१ डिसेंबर रोजी उपस्थित राहण्यासाठी ईडीने समन्स बजावले तेव्हा ते पंजाबमध्ये होशियारपूर येथे विपश्यनेसाठी गेले. मद्य घोटाळाप्रकरणी ईडीचे अधिकारी मनी लॉण्ड्रिंगच्या दिशेने तपास करीत असून, त्यांना केजरीवाल यांची जबानी हवी आहे.
यापूर्वी ११ जानेवारी रोजी त्यांचा गोवा दौरा ठरला होता. परंतु दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या तयारीनिमित्त त्यांनी तो लांबणीवर टाकला होता. अखेर आज ते गोव्यात दाखल झाले. दरम्यान, केजरीवाल लोकसभा निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी तीन दिवस गोव्यात असतील. राज्यसभा खासदार राजीव छड्डा व संदीप पाठक हेही त्यांच्यासोबत या दौऱ्यात असतील, गोव्यात आम आदमी पक्षाचे वेंझी व्हिएगश व कुझ सिल्वा हे दोन आमदार आहेत. केजरीवाल दोन्ही आमदार पक्षाचे नेते, तसेच प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर गोव्यासाठी दोन तर दक्षिण गोव्यात तीन इच्छुक उमेदवारांची नावे पक्षाकडे आलेली आहेत. पक्षाचे स्थानिक नेते 'इंडिया' आघाडीबाबत गोव्यातील चित्र स्पष्ट होण्याची वाट पहात आहेत. केजरीवाल यांनी नुकत्याच गुजरात दौन्यात पक्षाच्या आमदारांची भेट घेतली आणि तेथील राजकीय घडामोडी समजून घेतल्या. विरोधी पक्षात असताना त्यांना कोणत्या अडचणी येत आहेत, याचीही आम्ही विचारपूस केली होती. गोवा भेटीतही आम्ही अशीच विचारपूस करू, असे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान म्हणाले.
पक्षाचे गोवा प्रमुख अॅड. अमित पालेकर म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाचे केंद्रीय नेते पक्ष मजबूत करण्यासाठी राज्यात आहेत. पक्ष संघटना मजबूत करण्याबरोबरच लोकसभा निवडणुकीबाबतही चर्चा होईल.
आमदारांच्या मतदारसंघांना भेट
शुक्रवारी सकाळी ११ वा. आमदार कॅप्टन वेंझी व्हिएगस यांच्या बाणावली येथील मोहल्ला क्लिनिकला केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान भेट देणार आहेत. ११.३० वा. आपचे आमदार कुझ सिल्वा यांच्या मतदारसंघातील चिचणी येथील सेंथ सेबास्टीयन चॅपलला भेट देतील.
राज्यात पक्षाचे दोन्ही आमदार चांगले काम करत आहेत. बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगश यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. या भेटीत स्थानिक नेते, पक्षाचे माजी उमेदवार व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार आहोत. - अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली