महिला लोकप्रतिनिधी म्हणून आली नाही कामात अडचण: दिव्या राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 01:48 PM2023-03-07T13:48:12+5:302023-03-07T13:49:13+5:30
पणजी येथील 'लोकमत' कार्यालयाला त्यांनी भेट दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: महिला लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघाचा विकास साधताना आपल्याला कुठलीही अडचण आली नाही. किंवा कुठलीही कामे अडली नाहीत. सरकारकडून नेहमीच सहकार्य मिळाले. राजकारणात महिलांनाही समान स्थान असल्याचे प्रतिपादन पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी केले.
पणजी येथील 'लोकमत' कार्यालयाला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी प्रतिनिधींशी साधलेल्या संवादावेळी त्या बोलत होत्या. महिलांवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या ऐकून मन सुन्न होते. महिलांनी स्वालंबी म्हणजे आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे रहावे. तसे झाले तरच त्या अत्याचाराविरोधात ठोस असा निर्णय घेऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. राणे म्हणाल्या, की राजकारणाचा अनुभव नव्हता. त्यामुळे पर्येचे मतदार आपल्याला आमदार म्हणून स्वीकारतील का अशी भीती होती. मात्र, ज्या मताधिक्क्यांनी व मोठ्या मनाने त्यांनी आपल्याला स्वीकारले हे खरेच आश्चर्यचकीत करणारे आहे. राजकारणात महिलांशी दुजाभाव होतो, असे म्हणणे चुकीचे आहे. राजकारणात महिलांना समान स्थान आहे. एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून आपली कामे कधीच अडली गेली नाहीत. मुख्यमंत्री असो किंवा मंत्री त्यांनी कामांसंदर्भात नेहमीच सहकार्य केल्याचेह त्या म्हणाल्या.
मतदारसंघात अनेक कामे करणे शक्य झाले. खोटी आश्वासने देण्याची माझी कामाची पद्धत नाही. दिलेली आश्वासने पूर्ण करण्यावर नेहमीच आपला भर राहिला आहे आणि आहे, असेही दिव्या राणे म्हणाल्या.
स्वतंत्रपणे काम करुन दाखवले
विधानसभा निवडणूक लढवण्याचा जेव्हा निर्णय घेतला, तेव्हा अनेक जण आपल्याला कठपुतळी समजायचे. आपले पती तथा मंत्री विश्वजीत राणे हे आपल्याला मदत करतात, असे अजूनही लोक म्हणतात. मात्र, ते चुकीचे आहे. कामासाठी मी कधीही त्यांची मदत घेतली नाही. मंत्र्यांना फोन करणे, त्यांच्याशी बैठक घेणे, नोट मूव्ह करणे हे सर्व मीच करते, असेही त्या म्हणाल्या.
... तर तो अन्याय ठरला असता
तुम्ही पाच वर्षांपूर्वीच राजकारणात यायला हवे होते, असे अनेकजण म्हणतात. मात्र, पाच वर्षापूर्वी माझी मुले शिकत होती. त्यांना वेळ देणे आपली जबाबदारी होती. त्याकाळात राजकारणात आले असते तर मुलांप्रमाणेच मतदारांवरही अन्याय झाला असता. कारण मतदारांना तसेच एकूणच मतदारसंघाला वेळ देता आला नसता, असेही दिव्या राणे यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"