गोव्यात नोकऱ्या नाहीत म्हणून जातो विदेशात; परदेशात जाणाऱ्या युवकांची भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 08:27 AM2024-01-06T08:27:20+5:302024-01-06T08:28:17+5:30
पर्याय नसल्याच्या कारणास्तव त्यांना विदेशात जाणे भाग पडले.
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : राज्यात सरकारी नोकऱ्या मिळणे कठीणच असते, त्यात खासगी क्षेत्रातही नोकऱ्या नाहीत. अशा परिस्थितीत आयुष्यभर कमावण्यापेक्षा अवघ्या वर्षांसाठी चांगल्या पगारावर नोकरी पत्करून उर्वरित जीवन आरामात जगायचे, अशी धारणा असणारे लोक पोर्तुगीज पासपोर्टकडे वळतात. पर्याय नसल्याच्या कारणास्तव त्यांना विदेशात जाणे भाग पडले.
खिश्चन लोकांच्या टक्केवारीचे प्रमाण चांगले असलेल्या बार्देश तालुक्यात या समाजातील बहुतांश लोक विदेशात कामानिमित्त आहेत. यातील बऱ्याच लोकांनी पोर्तुगीज पासपोर्टवर युरोप देशात नोकरी मिळविली आहेत. त्यातील काही लोक निवृत्तीनंतरचे जीवन गोव्यात येऊन जगत आहेत.
पोर्तुगीज पासपोर्ट घेऊन विदेशात असलेल्या काही नागरिकाशी संवाद साधला असता गोव्यात नोकऱ्या मिळणे कठीण झाल्याचे त्यांनी सांगितले. नोकऱ्या उपलब्ध होत नसल्याने पोर्तुगीज पासपोर्ट घेऊन नोकरीसाठी विदेशात जाणे भाग पडत आहे. खासगी क्षेत्रात कमी पगार दिला जातो तर सरकारी क्षेत्रातील नोकऱ्या वशिल्याशिवाय प्राप्त होणे कठीण आहे. बऱ्याचवेळी शिक्षण असून सुद्धा त्यानुसार नोकरी नसल्याने पोर्तुगीजच्या पासपोर्टवर जाणे भाग पडते, गोव्यात इतर राज्यातील लोकांबरोबर स्पर्धा करावी लागते. दुसऱ्या राज्यात जाऊन नोकरी केली तर पगारातील जास्त रक्कम भाड्यावर तसेच इतर गोष्टींवर अधिक खर्च होतो, असे परदेशात जाणाऱ्यांचे म्हणणे आहे.
महिन्याला सुमारे २५ अर्ज
बार्देश तालुक्यातून महिन्याला सरासरी पोर्तुगीज पासपोर्टसाठी २० ते २५ अर्ज दाखल होत असतात, पोलिस खात्यातील विदेशी विभागाकडे (एफआरओ) सादर होणारे अर्ज नंतर संबंधित तालुक्यातील कार्यालयाकडे छाननीसाठी पाठवले जातात. २०२३ साली तालुक्यातील कार्यालयात पोर्तुगीज पासपोर्ट मिळवण्यासाठी अंदाजित २७५ अर्ज दाखल झाले होते. अर्ज करणारे बहुतांशी ख्रिश्चन समाजातील असल्याचीही माहिती उपलब्ध झाली आहे. काहिनी स्वतःच्या सोयीसाठी पोर्तुगीज भाषेचे शिक्षण प्राप्त केले आहे.