जीवनात आम्ही जसे जगतो, जी पात्रे साकारतो तेच आम्हाला अभिनयात करावे लागते: पंकज त्रिपाठी
By समीर नाईक | Published: November 23, 2023 04:28 PM2023-11-23T16:28:35+5:302023-11-23T16:31:42+5:30
कला अकादमीत गुरुवारी पार पडलेल्या इन कॉन्हर्वसेशन सत्रात पंकज त्रिपाठी बोलत होते.
पणजी: जीवनात आम्ही जसे जगतो, जी पात्रे साकारतो तेच आम्हाला अभिनयात करावे लागते. अभिनय करताना ज्या वेगवेगळ्या भावनांतून आम्हाला जावे लागते, तेच भावना खऱ्या आयुष्यात नाती सांभाळताना येत असतात. फक्त फरक एवढाच असतो, की खऱ्या जीवनात आमची परिस्थीतीच तशी असते, तर अभिनय करताना मात्र परिस्थीती निर्माण करावी लागतात, असे प्रतिपादन प्रसिध्द अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी केले.
कला अकादमीत गुरुवारी पार पडलेल्या इन कॉन्हर्वसेशन सत्रात पंकज त्रिपाठी बोलत होते. भारतीय चित्रपट समीक्षक आणि पत्रकार मयंक शेखर यांनी त्यांची मुलाखत घेतली. दरम्यान आपल्या साधेपणा व सोप्या उत्तरांनी पंकज त्रिपाठी यांनी उपस्थितांची मने जिंकली.
आयुष्यात जे आपण करतो, तेच अभिनयात केले जाते, असे वाटत असल्याने सर्वांनाच वाटते की मी देखील अभिनेता बनु शकतो, पण सेटवर गेल्यावर स्थिती वेगळीच असते. खऱ्या आयुष्यात त्या भावनेने गोष्टी आपोआप घडून जातात, कारण ती आपली माणसे असतात. त्यामुळे भावना देखील खऱ्या असतात. पण अभिनय क्षेत्रात पुढचा व्यक्ती नावापुर्ती नात्यात असतो, त्यामुळे त्यांच्याकडे ती भावना सहज येत नाही, ती आणावी लागतात. यासाठी अभिनय शिकणे, रस जाणणे गरजेचे बनते, असे त्रिपाठी यांनी यावेळी सांगितले.
अभिनय कला फक्त तुम्हाला स्टार करत नाही, तर त्याचा आणखी फायदा आहे की तुम्हाला चांगले नागरिक बनवतात. नम्र, दयाळू, व साधेपणा हे गुण कला आपोआप तुम्हाला देतात. याचे कारण म्हणजे, आम्ही वेगवेगळी पात्रांचे अभिनय करतो, त्यावेळेस त्या पात्राचा संघर्ष, दुख, वाईट काळ याचाही अनुभव आम्हाला येतो. यातून खऱ्या जीवनात देखील समोरच्या व्यक्ती कुठल्या भावनातून जात असते, याचा अंदाज येत असतो. आपण कितीही मोठे झालो तरी आपले पाय जमनीवरच असणे आवश्यक आहे. असे त्रिपाठी यांनी यावेळी सांगितले.
ओटीटी काळाची गरज आहे
ओटीटी व्यासपिठ जेव्हा देशात आले तेव्हा मोठमोठ्या अभिनेत्यांना वाटले की हे एकाप्रकारचा टी.व्ही आहे. त्यामुळे त्यांनी याला जास्त प्राधान्य दिले नाही. पण मी साधा कलाकार आहे, मी कुठल्याही भूमिकेला सहसा नाही म्हणत नाही,त्यामुळे ओटीटीला देखील स्विकारले. आज ओटीटीचा बोलबाला आणि मला ओटीटीचा मोठा स्टार मानला जातो. शेवटी कॅमेरा, सेट या पलिकडेही देवाचा मोठा कॅमेरा असतो, जो आम्हाला पाहत असतो. प्रामाणिक काम केले तर तुम्ही केव्हाच अयशस्वी होत नाही, असे त्रिपाठी यांनी ओटीटीबद्दल बोलताना सांगितले.