आषाढी एकादशीनिमित्त गोव्यातूनही केल्या जातात पायी वाऱ्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 01:40 PM2018-07-20T13:40:45+5:302018-07-20T13:55:16+5:30

मुळगाव येथील माऊली वारकरी मंडळाचे १७५ वारकरी पंढरपूरकडे रवाना

Ashadhi Ekadashi wari 2018 | आषाढी एकादशीनिमित्त गोव्यातूनही केल्या जातात पायी वाऱ्या 

आषाढी एकादशीनिमित्त गोव्यातूनही केल्या जातात पायी वाऱ्या 

Next

म्हापसा : टाळ, मृदंगाच्या गजरात गोव्यातील विविध गावांतून पंढरीच्या विठूरायाचे आषाढी एकादशीनिमित्त दर्शन घेण्यासाठी पंढरपूरपर्यंत पायी वारी केली जाते. मागील बऱ्याच वर्षांपासून विविध वारकरी मंडळं पंढरपूरच्या पायी वारीचे आयोजन नित्यनेमाने करत असतात. त्यामुळे वारीत जाणाऱ्या भक्तांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत असते. यात लहानमुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्व वारकऱ्यांचा समावेश असतो. 

माऊली या नामातच सारे वैभव दडलेले असून श्रद्धेने व निर्मळ मनाने केलेली सेवा प्रभावी असते. याचा साक्षात्कार गेली दहा वर्षे डिचोली तालुक्यातील मुळगाव वारकरी संस्थेने अनुभवला आहे. मुळगाव येथून या मंडळामार्फत यावर्षी २४५ वारकरी ९ जुलै रोजी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. यात ६८ महिलांचा समावेश असून ही वारी १३ दिवसांचा पायी प्रवास करून शनिवारी पंढरपूरला पोहोचणार आहे. विठ्ठलाचे दर्शन घेऊन २४ जुलै रोजी ही वारी माघारी परतणार असल्याची माहिती वारीचे प्रमुख रघुनाथ गाड यांनी दिली. 

मुळगाव येथील माऊली वारकरी मंडळाचे १७५ वारकरी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. या वारकरी मंडळाचे अध्यक्ष उदय फडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील किमान १३ वर्षांपासून या मंडळाच्या वतीने पंढरपूरची सतत वारी केली जाते. वारकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद चांगला असल्याचे ते म्हणाले. ब्राह्मणी माया विठ्ठल रखुमाई पंढरी वारी सावर्डे-सत्तरी वारकऱ्यांनी नुकतीच पंढरीच्या दिशेने वाटचाल केली आहे. तसेच फोंडा तालुक्यातील माशेल गावातून सुद्धा वारी पंढरपूरला दरवर्षी निघत असते. पायी करण्यात येणाऱ्या या वारीबरोबर अनेक लोक बसेसने  किंवा स्वत:च्या वाहनाने सुद्धा आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला नियमितपणे जात असतात. 

वारी दरम्यान अनेक ठिकाणी वारकऱ्यांच्या दुपारच्या व रात्रीच्या आहाराची तसेच निवासाची सोय केली जाते. वाटेत एखाद्याच्या आरोग्याची समस्या उद्भवू नये यासाठी योग्य ती काळजी सुद्धा घेतली जाते. वाटेवर अनेक ठिकाणी पायी जाणाऱ्या वारकऱ्यांचे मोठ्या आनंदाने स्वागत सुद्धा केले जाते. आषाढी एकादशीनिमित्त विठूरायाचे दर्शन घेऊन पावन होणे हा एकमेव उद्दिष्ट ठेवून गोव्यातून होणाऱ्या वारीत दरवर्षी मिळणाऱ्या प्रतिसादात वाढ होत असते. तसेच युवा वर्गही या वारीकडे आकर्षित होऊन त्यात सहभागी होत असल्याचे चित्र दिसत आहे. 
 

Web Title: Ashadhi Ekadashi wari 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा