अश्पाक बेंग्रेचा कारागृहात खून
By admin | Published: July 27, 2016 01:59 AM2016-07-27T01:59:56+5:302016-07-27T02:05:00+5:30
बार्देस : कोलवाळ येथील केंद्रीय कारागृहात कुख्यात गुंड अश्पाक बेंग्रे याचा तीक्ष्ण व धारदार हत्याराने गळा चिरून खून करण्यात आला.
बार्देस : कोलवाळ येथील केंद्रीय कारागृहात कुख्यात गुंड अश्पाक बेंग्रे याचा तीक्ष्ण व धारदार हत्याराने गळा चिरून खून करण्यात आला. मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अश्पाकवर हल्ला करून त्याचा खून केल्याच्या आरोपाखाली कारागृहात शिक्षा भोगत असलेला विनायक कारबोटकर याला अटक करण्यात आली आहे.
खून, प्राणघातक हल्ले, अमली पदार्थांचा व्यापार, खंडणी उकळणे यासारख्या अनेक गंभीर प्रकारच्या
गुन्ह्यांत सहभागी असलेल्या अश्पाकला जामिनाच्या कालावधीत वाढ करण्यासाठी न्यायालयात नेण्याची प्रक्रिया सुरू असतानाच त्याला ठार करण्यात आले. तत्पूर्वी त्याला जबर मारहाणही झाली असावी, असा कयास आहे. मारहाणीचे व्रण त्याच्या तोंडावर, हातावर, गालावर, पाठीवर तसेच अंगावर अनेक ठिकाणी उमटले होते. ही मारहाण तुरुंगातील अंतर्भागात झाली, तर मुख्य प्रवेशद्वाराच्या आतील भागात त्याचा खून करण्यात आला.
अश्पाकचा खून कोणत्या हत्याराने झाला, याबद्दल तुरुंग प्रशासन आणि पोलीसही मूग गिळून गप्प असले, तरी
कागद कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या
६ इंच लांबीच्या धारदार कटरने
अश्पाकचा गळा चिरण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
घटनेनंतर लगेच अश्पाक याला म्हापशातील उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (प्रतिनिधी)