आश्विन खलप पायउतार
By Admin | Published: September 10, 2015 02:04 AM2015-09-10T02:04:55+5:302015-09-10T02:05:28+5:30
बार्देस : म्हापसा अर्बन को-आॅपरेटिव्ह बॅँकेत बुधवारी झालेल्या तातडीच्या बैठकीत नाट्यमय बदल घडले. अध्यक्षपदाचा आश्विन खलप यांनी
बार्देस : म्हापसा अर्बन को-आॅपरेटिव्ह बॅँकेत बुधवारी झालेल्या तातडीच्या बैठकीत नाट्यमय बदल घडले. अध्यक्षपदाचा आश्विन खलप यांनी राजीनामा दिल्यानंतर समाजसेवक गुरुदास नाटेकर यांची अध्यक्षपदी, तर प्रज्ञा नाईक यांची उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात
आली.
पत्रकार परिषदेत माजी अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप म्हणाले की, संचालक मंडळाच्या बैठकीत बुधवारी आश्विन खलप यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी उपाध्यक्ष असलेले गुरुदास नाटेकर, तर उपाध्यक्षपदाच्या रिक्त झालेल्या जागी प्रथमच एका महिलेची निवड करण्यात आली. आश्विन खलप यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला. बॅँकेच्या हितार्थ संचालक मंडळात बदल घडवून आणण्यासाठी गांभीर्याने हा बदल घडविण्याचे एकमताने ठरले, असे त्यांनी सांगितले.
आपल्या संचालक मंडळात कसलाच वाद नाही. सगळे काही एकमताने होत असते; परंतु प्रगतीपथावरील या बॅँकेचे हीत संचालक मंडळात बदल केल्याने साधत असल्याने आश्विन खलप यांनी आपले पद रिक्त केले. त्यांच्या अल्प काळातील कार्याची मंडळाने प्रशंसा केली.
गेल्या दहा वर्षांत बँक अत्यंत बिकट परिस्थितीतून गेली व आज प्रगतीपथावर असताना निर्बंध घालण्यात आले. सध्या आमच्याकडे २ लाख ८२ हजार खातेदार असून १ लाख १९ हजार भागधारक आहेत. हाच आमचा परिवार आहे.
या परिवाराचे हित जपणे हेच मंडळाचे कर्तव्य आहे. २००२ ते २००५ या तीन वर्षांसाठी प्रशासकाचे प्रशासन होते. या काळात बॅँकेची स्थिती सुधारण्याऐवजी बिघडली व त्या वेळी भागभांडवलावर ६ कोटी ६१ लाख रुपये होते. तर आजच्या घडीस २४ कोटी ४० लाख रुपये आहेत. शिवाय ३ कोटी रुपये सरकारने काढून घेतले आहेत. २००५ साली एनपीए १०५ कोटी रुपये होता. तो आता ५४ कोटींवर आलेला आहे. दि. ३१ मार्च २०१५ ला बॅँक सगळ्या कटकटीतून मुक्त होऊन पुढचे पाऊल उचलण्यास सिद्ध होती. रिझर्व्ह बॅँकेच्या सर्व निकषाची जाणीव ठेवून पुढे कूच करायची तयारी असतानाच निर्बंध लागू झाले.
आता नव्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली बॅँकेची पुढील वाटचाल होणार आहे.
फॅमिलीराज करायची आपली मुळीच इच्छा नाही. बॅँकेचे हीत जपणे हाच एकमेव हेतू असल्याचे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेत सात संचालक उपस्थित होते. नूतन चेअरमन गुरुदास नाटेकर यांनी आपल्यास अध्यक्ष केल्याबद्दल आभार मानले. (प्रतिनिधी)