‘एशियन बीच गेम्स’ गोव्यात!, २०२० मध्ये होणार स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 09:11 PM2017-12-17T21:11:57+5:302017-12-17T21:12:10+5:30
गोव्याचे समुद्रकिनारे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहेत. देश-विदेशातील खेळाडूंनाही गोव्याचे आकर्षण आहे. त्यामुळे ‘एशियन बीच गेम्स’ या स्पर्धा गोव्यात आयोजित करण्यावर भारतीय आॅलिम्पिक संघटनेचा (आयओए) भर होता.
सचिन कोरडे :
पणजी - गोव्याचे समुद्रकिनारे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहेत. देश-विदेशातील खेळाडूंनाही गोव्याचे आकर्षण आहे. त्यामुळे ‘एशियन बीच गेम्स’ या स्पर्धा गोव्यात आयोजित करण्यावर भारतीय आॅलिम्पिक संघटनेचा (आयओए) भर होता. अखेर त्यास गुरुवारी मंजुरी मिळाली. गोवा सरकारनेही सकारात्मकता दाखवत आयओएकडे पत्र सादर केले आहे. आयओएची नवी कार्यकारिणी नुकतीच निवडण्यात आली. अध्यक्ष नरींदर बत्रा आणि नवनियुक्त सचिव राजीव मेहता यांनी कार्यभार स्वीकारताच पहिली बैठक दिल्लीत घेतली. या बैठकीत २०२० मध्ये होणा-या एशियन बीच गेम्स आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यावर चर्चा झाली. उल्लेखनीय म्हणजे, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धासुद्धा गोव्यातच होत आहेत. या स्पर्धेच्या तारीखही निश्चित करण्यात आली. पुढील वर्षी ४ ते १८ नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धा गोव्यात होतील.
यासंदर्भात, भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे खजिनदार आनंदेश्वर पांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्तावर शिक्कामोर्तब केले. ते म्हणाले, आशियाई बीच गेम्स गोव्यात व्हाव्यात, अशी प्राथमिकता आयओएची होती. यापूर्वी स्पर्धा स्थळांवर चर्चासुद्धा झाली होती. त्यात मुंबईनंतर गोव्याचे नाव आघाडीवर होते. आता नव्या कार्यकारी समितीच्या बैठकीत यावर पुन्हा चर्चा झाली. गोव्याला सगळ्यांचीच पसंत आहे. देश-विदेशातील खेळाडू गोव्यात येण्यास उत्सुक आहेत. गोव्यात बीच गेम्ससाठी साधनसुविधा आणि पोषक वातावरण आहे. त्यामुळे सध्यातरी गोव्याला मंजुरी देण्यात आली आहे. आता सरकारची आसक्ती आणि प्रयत्न महत्त्वाचे ठरतील. गोवा सरकार याची पूर्तता करेल, असा विश्वास आम्हाला आहे. दुसरीकडे, गोवा आॅलिम्पिक संघटनेचे सचिव आणि आयओएचे सदस्य गुरुदत्त भक्ता यांनी गोव्याच्या यजमानपदाबाबत आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, एशियन बीच गेम्स ही मोठी स्पर्धा आहे. गोव्याच्या इतिहासात तिचे नाव कोरले जाईल. सरकारनेही याबाबत उत्सुकता दाखवली आहे. या स्पर्धेसाठी लवकरच बोली लावण्यात येईल. भारताबरोबरच श्रीलंका, इंडोनशिया, मोरक्कासारखे देशही या स्पर्धेसाठी बोली लावतील.
स्पर्धेबाबत...
ही स्पर्धा आॅलिम्पिक काउंसिल आॅफ एशियाआयोजित करते. याआधी, ही स्पर्धा व्हिएतनामने आयोजित केली होती. त्यात ४१ आशियाई संघांच्या एकूण २ हजार खेळाडूंनी भाग घेतला होता. स्पर्धेत १४ क्रीडा प्रकार असतात. त्यात व्हॉलीबॉल, फुटबॉल, हॅण्डबॉल, कबड्डी, सेपाकटॅकरो, सेलींग, विंडसर्फिंग, पॅराग्लायडिंग आणि ट्रायथलोनचा समावेश असतो. पहिली स्पर्धा बाली येथे २००८ मध्ये झाली होती.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची तारीख निश्चित!
साधनसुविधा व इतर कारणांमुळे गोव्यात होणाºया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेवर संशयाचे ढग होते. गेल्या वर्षी ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, या वेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ही गोव्यातच व्हावी, असा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. ही स्पर्धा गोव्यात होईल, अशी हमी आयओएने मुख्यमंत्र्यांना दिली. त्यानुसार गोवा सरकारने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. आता ही स्पर्धा पुढील वर्षी ४ ते १८ नोव्हेंबर दरम्यान होईल. निश्चितच, आता सरकारच्या कामांना अधिक गती मिळणार आहे.
कोट :
आंतरराष्ट्रीय पातळीवरील बीच स्पर्धा गोव्यात होणे ही गोमंतकीयांसाठी अभिमानाची बाब आहे. आयओएने गोव्याला प्राथमिकता दिली. त्यासाठी त्यांचे आभार. बैठकीत स्पर्धेला मंजुरी देण्यात आली. यावर चर्चा झाली. आता स्पर्धेसाठी बोली लावण्यात येईल. त्यासाठी आम्ही सर्वोेतोपरी प्रयत्न करणार आहोत- गुरुदत्त भक्ता, सचिव (गोवा आॅलिम्पिक संघटना).