इफ्फीचेच नव्हे, तर विज्ञान महोत्सवाचेही पास मागा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2024 09:25 AM2024-02-01T09:25:13+5:302024-02-01T09:25:30+5:30
शिक्षकांनी महोत्सवातही सहभागी व्हावे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : इफ्फीचे पास सर्वच मागतात, मात्र विज्ञान महोत्सवाचे पास मागण्यास फारसा उत्साह नसतो. विज्ञान शिक्षकांनीसुद्धा या महोत्सवाबाबत उत्सुकता दाखवत त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
पणजी येथील ईएसजी संकुल येथे आयोजित नवव्या विज्ञान महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ३० जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान हा महोत्सव चालेल. यावेळी विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे संचालक डॉ. लेविसन मार्टिन्स, ईएसजीच्या उपाध्यक्ष डिलायला लोबो व अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, २०१५ पासून गोव्यात विज्ञान महोत्सवाचे आयोजन होत असून यंदाचे हे ९ वे वर्ष आहे. गोव्यात हा महोत्सव सुरू करण्यात माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व विज्ञान भारतीचे जयंतराव सहस्रबुद्धे यांचे मोठे योगदान आहे. विज्ञान महोत्सवामुळे विद्यार्थी, शिक्षक तसेच या क्षेत्राशी संबंधित मिळून सुमारे ६ हजार जणांना लाभ होईल.
या महोत्सवाला शाळेचे सर्वच विद्यार्थी भेट देऊ शकत नाहीत; त्यामुळे किमान सर्व शाळा तसेच महाविद्यालयांतील विज्ञान हा विषय शिकवणाऱ्या शिक्षकांनी या महोत्सवाला भेट देऊन तेथील गोष्टी जाणून घ्याव्यात, चर्चासत्रांत भाग घ्यावा, म्हणजे ते विद्यार्थ्यांना याबाबत माहिती देऊ शकतील, असे आवाहन त्यांनी केले.
विज्ञानाची भीती दूर करा
शाळेच्या पिकनिक किनाऱ्यांवर नेण्याएवजी मिरामार येथील सायन्स सेंटर, दोनापावला येथील एनआयओ, वास्को येथील पोलर संस्था, जुने गोवे येथील आयसीआर, आदी संस्थांमध्ये नेऊन विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी गोडी निर्माण करून विज्ञान या विषयातील भीती दूर करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.