बेरोजगारीबाबत होतेय लोकांकडून विचारणा; पल्लवी धंपे यांनी सांगितला अनुभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2024 09:49 AM2024-04-17T09:49:38+5:302024-04-17T09:53:22+5:30
गोव्यात विकास प्रकल्पाच्या बाबतीत जी भूमिका भाजपाची आहे तीच आपली भूमिका आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव: आपल्याला प्रचारादरम्यान लोकांकडून बेरोजगारी, शिक्षण व महिला सशक्तीकरण तसेच कौशल्य विकास या विषयावर प्रश्न विचारले जातात. खनिज व्यवसायासंबंधी अद्याप कुणीही प्रश्न विचारला नाही. मात्र, रोजगाराच्या संधी कमी असल्याबाबत विचारणा होते. म्हादईचा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याने आपण त्यावर प्रतिक्रिया देणे उचित नसल्याचे भाजपच्या दक्षिण गोवा उमेदवार पल्लवी धेपे यांनी सांगितले.
गोव्यात विकास प्रकल्पाच्या बाबतीत जी भूमिका भाजपाची आहे तीच आपली भूमिका आहे. यात रेल्वे दुपदरीकरण, कोळसा वाहतूक व इतर काही विषय असतील. आपल्याला लोकांना भेटण्यासाठी लवकरच मडगावात कार्यालय सुरू करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी वीजमंत्री सुदिन ढवळीकर दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षा सुवर्णा तेंडुलकर; तसेच इतर भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
जे विरोध करताहेत, तेच लाभार्थी
रेल्वे दुपरीकरण प्रकल्पाला होणाऱ्या विरोधाबाबत वीजमंत्री ढवळीकर म्हणाले, जे लोक कोकण रेल्वेला त्यावेळी विरोध करीत होते तेच आता जास्त रेल्वेने प्रवास करतात. सागरमाला योजना आली, तरी जेवढी कोळसा वाहतूक निश्चित केली आहे, तेवढीच वाहतूक होणार, असे ते म्हणाले.
पर्यावरण संतुलन राखून विकासप्रकल्प
भाजपाच्या राष्ट्रीय व राज्य नेतृत्वाने लोकसभेची उमेदवारी देत जो विश्वास दाखवला तो विश्वास आपण सार्थ ठरवणार; तसेच पर्यावरण व विकास प्रकल्प यांच्यात ताळमेळ राखून विकासकामे केली जातील, असे पल्लवी धेपे यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांसमोर लोकसभा उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना सांगितले.