'द अॅस्पर्न पेपर्स' ने केली निराशा, सिनेमाला प्रतिसाद फारसा मिळाला नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 01:29 AM2018-11-22T01:29:20+5:302018-11-22T01:29:36+5:30
- संदीप आडनाईक पणजी : 'द अॅस्पर्न पेपर्स' ने ४९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा पडदा मंगळवारी उघडला, परंतु केवळ निमंत्रितांसाठी ...
- संदीप आडनाईक
पणजी : 'द अॅस्पर्न पेपर्स' ने ४९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा पडदा मंगळवारी उघडला, परंतु केवळ निमंत्रितांसाठी असलेल्या या उद्घाटनाच्या सिनेमाने रसिकांची निराशा केली. पूर्वायुष्यातील प्रेमाविषयीची घटना चव्हाट्यावर येऊ नये, यासाठी नायकाने दिलेला केलेला आटापिटा आणि त्याच आठवणी जपत आयुष्य कंठणा-या प्रियतमेचा कणखरपणा असा या सिनेमाचा विषय होता. पदार्पणातच वेगळा विषय मांडण्याचा दिग्दर्शकाने प्रयत्न केला असला तरी रंजकता कमी होती. त्यामुळे या सिनेमाला प्रतिसाद फारसा मिळाला नाही. विनोदाची पखरण आणि फ्लॅशबॅकचे पारंपारिक तंत्र वापरुन हा सिनेमा पडद्यावर आणला आहे.
अॅडाप्शन आॅफ हेन्री जोन्स या जीन पेव्हन्स यांच्या कादंबरीवर आधारित हा 'द अॅस्पर्न पेपर्स' सिनेमा बेतलेला आहे. ज्युलियन लाँडिस हे फ्रेंच अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी पूर्ण लांबीचा सिनेमा केला आहे. यापूर्वी त्यांनी अनेक लघुपट, फॅशन सिनेमा, जाहिराती, सांगितिका दिग्दर्शित केल्या आहेत.
जेफ्री अॅस्पर्न या रोमँटिक कवयित्री. सिनेमाचा नायक मॉर्टनविट हा तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला लेखक प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. त्याच्यावर जेफ्रीचा प्रभाव आहे. व्हेनिसमध्ये असताना प्रेमिका जूलियाना बोर्डरो हिचा लिहिलेल्या प्रेमपत्राचा संदर्भ या सिनेमाचा गाभा आहे. जूलियाना तिची भाची मिस टीनासोबत आता व्हेनिसजवळील वेनेटियन पलाजो येथे राहते आहे. प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या नायकाला प्रेमपत्राचा दुरुपयोग होईल अशी भीती वाटत असते. त्यातून तो जूलियानाच्या भाचीसोबत जवळीक साधू इच्छित आहे. काहीही करुन त्या पत्रांचा शोध घेणे हे त्याचे ध्येय आहे. परंतु जूलियाना त्याला दाद लागू देत नाही. मॉर्टनविटचा खरा हेतू जेव्हा मिस टीनाला समजतो, तेव्हा ती ही सारी प्रेमपत्रे नष्ट करते.
खासगी आयुष्यातील गुपिते जतन करण्यासाठी हा सारा प्रपंच. प्रकाशझोतात असलेल्या लेखकामुळे खासगी आयुष्यावरही कशी गदा येते, हे या सिनेमातून मांडण्यात आले आहे. कित्येक वर्षे आपले जीवन प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या कुटूंबावर अचानक वलयांकित प्रसिध्दीला सामोरे जावे लागते. त्यामुळे त्या कुटुंबीयावर आघात होतो. मिस टीना या सा-या प्रकरणात अतिशय कणखर भूमिका घेताना दिसते. वेळ येताच कोमलह्दयी टीना टोकाची भूमिका घेते आणि आपल्या जीवलगांची गुपिते गुप्तच ठेवण्यात यशस्वी ठरते.
चित्रपटाची मांडणी काहीशी पारंपारिक फ्लॅशबॅक तंत्रातून उलगडते. परंतु विनोदाची पखरण करत आशयसूत्र पुढे नेण्यात दिग्दर्शक अपयशी ठरला आहे.