मोकळेपणाने सांगा, माझे काय चुकले! मावळते डीजीपी जसपाल सिंग यांची भावनिक साद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2024 10:52 AM2024-07-16T10:52:29+5:302024-07-16T10:52:49+5:30
अलोक कुमार यांनी घेतला ताबा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: 'माझे काय चुकले ते मोकळेपणाने सांगावे', अशी भावनिक साद गोव्याचे मावळते पोलिस महासंचालक डॉ. जसपाल सिंग यांनी घातली आहे. काल, सोमवारी त्यांनी आपला पदभार नव्या डीजीपींना सोपविण्याच्या काही क्षण अगोदरच सोशल मीडियावर पोस्ट केली.
आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबीयांचे घर मोडतोड केल्या प्रकरणानंतर डीजीपी वादाच्या भोवऱ्यात सापडल्यामुळे त्यांच्या बदलीची शिफारस राज्य सरकारने केंद्राकडे केली होती. आसगाव येथे बाऊन्सरकडून घराची मोडतोड करण्याच्या प्रकरणात अडचणीत सापडल्यानंतर त्यांची गोव्यातून उचलबांगडी करण्याच्या हालचाली सुरू होत्या. अखेर त्यांच्या बदलीचा निर्णय झाला. सोमवारी त्यांनी नवे डीजीपी अलोक कुमार यांच्याकडे सूत्रे सोपविली. त्यापूर्वी त्यांनी आपले सहकारी, पत्रकार व इतरांना एक संदेश पाठवला असून त्यात ते आपले काय चुकले ते प्रांजळपणे सांगा, अशा शब्दात भावनिक साद घालतात. 'माझ्या प्रिय सहकाऱ्यांनो' या शब्दांनी सुरुवात केलेल्या त्यांच्या संदेशात त्यांनी त्यांच्या गोव्यातील कारकिर्दीत महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख केला आहे.
'त्या' घटनेने व्यथित पण, मी सैनिक आहे...
सिंग यांनी आपल्या संदेशात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कार्यक्रमावेळी राखण्यात आलेल्या कायदा सुव्यवस्थेचा उल्लेख केला आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे आसगाव प्रकरणाचा उल्लेख 'अलीकडची घटना' या शब्दात केला आहे. ते म्हणतात की, अलीकडच्या घटनेमुळे मी व्यथित झालो हे खरे आहे, परंतु आम्ही सैनिक असल्यामुळे टीकाही सहन करण्याची क्षमता माझ्यात आहे. माझा कुणावरही राग नाही. गोव्यातून मी केवळ चांगल्या आठवणी नेणार आहे. मी माझे कुठे चुकले ते मला निःसंकोचपणे सांगा, असे म्हणत त्यांनी नवीन डीजीपी अलोक कुमार यांना शुभेच्छाही दिल्या.
अलोक कुमार यांनी घेतला ताबा
नवीन डीजीपी अलोक कुमार यांनी आपल्या पदाचा ताबा घेतला. डॉ. जसपाल सिंग यांनी आपल्या पदाची सूत्रे त्यांच्याकडे सोपविली. डीजीपी म्हणून ताबा घेतल्यानंतर अलोक कुमार यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली.