आसगाव घर मोडतोड प्रकरण; पूजा शर्माला जेल की बेल? जामीन फेटाळण्यासाठी जोरदार युक्तिवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2024 11:17 AM2024-07-09T11:17:38+5:302024-07-09T11:18:17+5:30
आसगावातील 'त्या' बांधकामाची पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: आसगाव येथे बाऊन्सर पाठवून घराची मोडतोड करण्याच्या प्रकरणात मुंबई येथील पूजा शर्मा हिच्या अटकपूर्व जामिनावर पणजी प्रधान सत्र न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. या प्रकरणात न्यायालयाने निवाडा राखून ठेवला असून, बुधवारी निवाडा सुनावला जाण्याची शक्यता आहे.
या घटनेमागे पूजा शर्मा हीच मुख्य सूत्रधार असल्याचे प्रथमदर्शनी तपासांत दिसून येत असल्याचा युक्तिवाद एसआयटीतर्फे प्रोसिक्युशनने केला आहे. संशयिताकडून तपासाला सहकार्य मिळत नसल्यामुळे तिची पोलिस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून केला आहे. त्यामुळे तिला कोणत्याही परिस्थितीत अटकपूर्व जामीन मंजूर करू नये, अशी मागणी केली आहे. पणजी प्रधान सत्र न्यायालय आता येत्या बुधवारी (१० जुलै) निर्णय देणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजकीय हस्तक्षेप?
पूजाने सादर केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारपासून सुनावणी सुरू झाली. तिचे वकील अॅड. सुरेंद्र देसाई यांनी युक्तिवाद करताना या घटनेमागे राजकीय हस्तक्षेपाचा दावा केला. मुख्यमंत्री आणि आमदार तपासकामांत हस्तक्षेप करीत असल्याचा दावा त्यांनी केला.
...तर पूजाला अटक
पूजा हिला अटकपूर्व जामीन अर्जाच्या बाबतीत अंतरिम दिलासा दिला नसला, तरी या प्रकरणात सुनावणी सुरू असल्यामुळे एसआयटीकडून तिला अटक केली नाही. मात्र, तिचा अटकपूर्व जामीन बुधवारी न्यायालयाने फेटाळल्यास मात्र एसआयटी तिच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करू शकतात. त्यामुळे सर्वांच्या नजरा निवाड्याकडे लागल्या आहेत.
आसगावातील 'त्या' बांधकामाची पाहणी
आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबीयांच्या मोडण्यात आलेल्या घराची काल सोमवारी पंचायत तसेच गट विकास कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या संबंधीचा अहवाल पंचायत मंडळाच्या १५ जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत सादर केला जाणार आहे.
आरटीआय कार्यकर्ते काशिनाथ शेट्ये, जयराम पंडित तसेच डेस्मंड आल्वारीस यांनी पंचायतीकडे लेखी तक्रार दाखल केली होती. बेकायदेशीररित्या घर मोडल्याप्रकरणी पूजा शर्मा हिच्या विरोधात तसेच प्रदीप आगरवाडेकर आणि प्रिन्सा आगरवाडेकर यांना घराचे बांधकाम करण्यास हरकत तक्रारीतून घेण्यात आली होती. घराची योग्य कागदपत्रे नसताना घराचे बांधकाम करण्यास किंवा दुरुस्ती करण्यास परवानगी, तसेच ना हरकत दाखला देण्यास अर्जदारांकडून हरकत घेण्यात आली. तसेच घराचा वीज आणि पाण्याचा पुरवठा तोडण्यात यावा, कराची थकबाकी वसूल करण्यात यावी. बांधकाम कारवाई करून पाडावे, अशी मागणी केली होती.
त्यानंतर घराची पाहणी करण्याचा निर्णय मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पाहणीवेळी सरपंच हनुमंत नाईक, सचिव राजेश आसोलकर, गटविकास अधिकारी कृष्णा गडेकर, पंच सदस्य उपस्थित होते.