आयआयटीच्या विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला; पाच ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 12:51 PM2023-06-08T12:51:37+5:302023-06-08T12:52:06+5:30
फर्मागुडी येथील घटनेने खळबळ : दारुच्या बाटलीने डोक्यात वार
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : फर्मागुढी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयआयटीच्या एका विद्यार्थ्यावर किरकोळ कारणावरून पाच जणांनी प्राणघातक हल्ला केला. सुदांशू पांडे असे जखमीचे नाव आहे. हल्ल्यावेळी संशयितांनी सुदांशूच्या डोक्यात दारूच्या बाटलीने वार केल्याने तो बेशुध्द पडला. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर आहे.
या प्रकरणी फोंडा पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. रघू नाईक (वय २७, रा. नागझर), श्रीवेद साळगावकर (वय २१, रा. दुर्गाभाट), प्रथम तारी (२३, रा. बांदोडा) व सनी कळंगुटकर (वय १८, रा. खडपाबांध), अशी त्यांची नावे असून, एका अल्पवयीनाची रवानगी अपना घरमध्ये केली आहे.
सविस्तर वृत्तानुसार, फर्मागुढी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा परिसर रात्रीच्या वेळी मद्यपींचा अड्डा बनत चालला आहे. अनेक तरुण रात्रीच्या वेळी या ठिकाणी जमतात व मोठमोठ्याने गाणी लावून मद्यपान करतात. मंगळवारी रात्रीसुद्धा अशीच एक कार घेऊन पाचजण फर्मागुढी परिसरात आले होते. त्यावेळी आयआयटीचा विद्यार्थी असलेल्या सुदांशूने त्यांना तिथून जाण्यास सांगितले. सुदांशूच्या या गोष्टीचा राग धरून संशयितांनी त्याला बेदम मारहाण केली. त्याचवेळी एकाने स्वत:जवळील दारूच्या बाटलीने सुदांशूच्या डोक्यात वार केल्याने तो जागीच बेशुद्ध पडला.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुदांशूला फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात दाखल केले. त्यानंतर पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक रश्मी भाईडकर पुढील तपास करत आहेत.
पळून जाण्याचा प्रयत्न
संशयितांची चौकशी चालू असताना अल्पवयीन असलेल्या संशयिताने पोलिसांची नजर चुकवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला पाठलाग करत पकडून पुन्हा पोलिस ठाण्यात आणले. यावेळी अल्पवयीन संशयिताचे नातेवाइक पोलिस ठाण्यातच होते. या प्रकरानंतर पोलिसांनी त्यांना बाहेर काढले.
इथे रात्रीचे येऊन बघाच
गोवा इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसमध्ये रोजच मद्यपींचा धिंगाणा चालू असतो. यातूनच वादावादी, मारहाणीच्या अनेक घटना घडल्या आहेत. परंतु, कालचा प्रसंग गंभीर असल्यामुळेच हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचू शकले. यापुढे अशी घटना घडू नये, यासाठी या परिसरात पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी होत आहे.