वैमनस्यातून युवकावर प्राणघातक हल्ला
By काशिराम म्हांबरे | Published: February 16, 2024 04:08 PM2024-02-16T16:08:47+5:302024-02-16T16:10:24+5:30
या हल्ल्यात प्रणव फडते गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला गोवा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
म्हापसा - हळदोणा मतदार संघातील गोळजुवे-खोर्जुवे येथील प्रणव फडते (वय २३) या युवकावर पूर्व वैमनस्यातून चॉपरने प्राणघातक हल्ला करण्याचा प्रकार घडला आहे. या हल्ल्यात प्रणव फडते गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला गोवा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
घटना गुरुवारी मध्यरात्री ११.४५ वाजण्याच्या सुमाराला प्रणवच्या घरासमोर घडल्याची माहिती म्हापसा पोलिसांकडून देण्यात आली. हल्ल्यानंतर घटना स्थळावरून पळून गेलेले संशयित दिगन नाईख (डोंगरी) तसेच त्याचे दोन साथीदार फरार आहेत. पोलीस त्यांच्या मार्गावर आहेत. घटनेनंतर प्रणवचा चुलत भाऊ राहुल फडते यांनी म्हापसा पोलीस स्थानकावर तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी संशयिता विरोधात गुन्हा नोंद करुन घेतला आहे.
संशयित दिगन व प्रणव यांच्यातील वैमनस्य होते. त्याचा बदला घेण्यासाठी तो गोळजुवे येथे आला व त्यांनी चॉपरने त्याच्या हल्ला चढवला. वार चकवण्यासाठी प्रणवने आपले हात पुढे केले. त्यात त्याच्या दोन्ही हातांना मार लागल्याने तो रक्तबंबाळ झाला. तसेच संशयिताच्या तावडीतून सुटका करुन घेत तेथून पळून गेला. त्यानंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाले.
हल्ल्याची माहिती मिळताच म्हापसा पोलीस घटना स्थळी दाखल झाले. तोपर्यंत प्रणवला प्रथम उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात व तेथून नंतर गोवा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपनिरीक्षक बाबलो परब पुढील तपास कार्य करीत आहे.