विधानसभा विसजर्नचा प्रश्नच नाही, मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्र्यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 11:06 PM2019-02-18T23:06:11+5:302019-02-18T23:09:24+5:30
विधानसभेच्या विसजर्नाचा प्रश्न येत नाही आणि विसजर्न करण्यासारखी स्थितीही नाही, असे पर्रीकर मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दोघा मंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले.
पणजी : विधानसभेच्या विसजर्नाचा प्रश्न येत नाही आणि विसजर्न करण्यासारखी स्थितीही नाही, असे पर्रीकर मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दोघा मंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले. विधानसभेचे विसर्जन करून लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणुका घेतल्या जातील अशी अफवा पसरली होती. सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री पर्रीकर यांनी दोनापावल येथील आपल्या खासगी निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले, की विधानसभा विसजर्नाचा मुद्दा कुणीच बैठकीत उपस्थित केला नाही. मुद्दा उपस्थित करण्याचीही गरज नाही, कारण विसजर्नाचा प्रश्नच येत नाही. केवळ अफवाच पसरविल्या जात आहेत.
कृषी मंत्री विजय सरदेसाई यांना पत्रकारांनी विचारले असता, सरदेसाई म्हणाले की विधानसभा विसर्जित करण्यासारखे काहीही घडलेले नाही. मध्येच विसजर्न करण्यासारखी स्थितीही आलेली नाही. कुणालाच विधानसभेचे विसजर्न नको आहे. भाजपने याविषयी भूमिका स्पष्ट करावी असे मी पूर्वी म्हटले होते. त्यानुसार भाजपने व मुख्यमंत्र्यांनीही भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे विधानसभा विसजर्नाची शक्यता आणखी राहिलेली नाही.
म्हापशाविषयी भूमिका स्पष्ट
दरम्यान, भाजपचे म्हापसा मतदारसंघाचे ज्येष्ठ आमदार फ्रान्सिस डिसोझा यांचे निधन झाल्याने म्हापशाची जागा रिकामी झाली आहे. तिथे तुमचा गोवा फॉरवर्ड पक्ष उमेदवार उभा करू पाहत आहे काय असे पत्रकारांनी विचारताच मंत्री सरदेसाई म्हणाले की आपण तसे म्हटलेले नाही पण डिसोझा यांच्या मुलाला कोणत्याही प्रकारे मदत करण्यास आपण तयार आहोत, जेणोकरून वडीलांचा सामाजिक कार्याचा वारसा त्यांचा मुलगा पुढे नेईल. यापूर्वीचा इतिहास जर पाहिला तर एखादा आमदार मृत्यू पावल्यानंतर त्याच्या मुलाला, मुलीला, पत्नीला किंवा त्या आमदारावर अवलंबून असलेल्या नात्यातीलच एखाद्या व्यक्तीला तिकीट दिली जात असते. त्यानुसार भाजप कदाचित डिसोझा यांच्या मुलालाच तिकीट देईल.