रात्रीच्या वेळी सोडले जाते स्मार्टसिटीचे सांडपाणी नाल्यात; बेकायदा कामांचा उत्पल पर्रीकर यांच्याकडून पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 12:31 PM2023-05-01T12:31:37+5:302023-05-01T12:32:15+5:30
पर्रीकर यांनी शुक्रवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास सांतीनेज भागातील कामांची पाहणी करून कशाप्रकारे रात्रीची बेकायदेशीर कामे करण्यात येते याचा खुलासा केला.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: स्मार्ट सिटीची जी कामे सुरू आहेत, हे कुठल्याही उपाययोजनाशिवाय होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सांतीनेज येथे मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. परंतु कुठल्या खालच्या स्तरावर काम सुरू आहे, हे रात्रीचे समोर येते. मध्यरात्री दोनच्या सुमारास सांतीनेज येथील सांडपाणी चेंबर्सचे पाणी पंपाद्वारे खेचून थेट बाजूच्याच नाल्यात सोडले जाते. यातून पावसाळ्यात पणजीवासीयांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे, असे उत्पल पर्रीकर यांनी सांगितले.
पर्रीकर यांनी शुक्रवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास सांतीनेज भागातील कामांची पाहणी करून कशाप्रकारे रात्रीची बेकायदेशीर कामे करण्यात येते याचा खुलासा केला. सांडपाणी थेट नाल्यात सोडण्यात येते हे मुळात बेकायदेशीर आहे. परंतु, हे करण्यापलीकडे कंत्राटदाराकडे कुठलाही विकल्प राहिलेला नाही. हे सांडपाणी जर पंपाद्वारे नाल्यात सोडले नाही तर रस्त्यावर साचणार आहे. आता ही परिस्थिती आहे तर पावसाळ्यात पणजीची स्थिती काय होईल, याचा विचारही करता येत नाही. रस्तेदेखील अत्यंत खालच्या स्तराचे बनवले आहेत. आतापर्यंत ९ ट्रक या स्मार्ट सिटीच्या रस्त्यावर उलटलेत, यातून कामाचा दर्जा दिसतो, असे त्यांनी सांगितले.
जे काम सध्या सुरू आहे, याची जबाबदारी कोणच घेताना दिसत नाही. नगरसेवक, महापौर कुणीही या ठिकाणी फिरताना दिसत नाही. सर्व गोष्टी घाईघाईने करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी देखील या कामाचा भाग आहे. परंतु त्या देखील याबाबत गंभीर दिसत नाही, असेही म्हणाले.
पणजीच्या स्थितीला बाबूशच जबाबदार
पणजीत २५ वर्षे आमदारांनी काय केले नाही, असा आरोप बाबूश वारंवार करत आहेत. परंतु गेली २० वर्षे बाबूशच्याच हाती महानगरपालिका राहिली आहे. सध्या जी कामे होत आहेत, ती महानगरपालिकेच्या हाताखाली असतात. त्यामुळे पणजीची जी स्थिती आहे, याला बाबूशच कारणीभूत आहे. बाबूशचे नगरसेवक देखील अकार्यक्षम आहेत. त्यांना काही बोलण्याचादेखील अधिकार नसतो, असेही उत्पल पर्रीकर यांनी यावेळी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"