मांडवी व जुवारी नदीत वाजपेयींच्या अस्थींचे शुक्रवारी विसर्जन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 12:38 PM2018-08-21T12:38:33+5:302018-08-21T12:40:10+5:30
गोव्यातील मांडवी व जुवारी नदीत शुक्रवारी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे विसर्जन केले जाणार आहे.
पणजी : गोव्यातील मांडवी व जुवारी नदीत शुक्रवारी (24 ऑगस्ट) माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे विसर्जन केले जाणार आहे. तत्पूर्वी दोन दिवस उत्तर व दक्षिण गोव्यातील विविध मतदारसंघांमध्ये वाजपेयींच्या अस्थींचे दर्शन लोकांना व्हावे म्हणून भाजपतर्फे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर आणि सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बुधवारी तेंडुलकर व भाजपचे खजिनदार संजीव देसाई हे दिल्लीला जात आहेत. त्यांच्याकडून दोन अस्थिकलश गोव्यात आणले जातील. सायंकाळी पाच वाजता दाबोळी विमानतळावर अस्थिकलश पोहचतील. सायंकाळी सहा वाजता सांकवाळ येथे शांतादुर्गा मंदिराच्या बाजूला अस्थिकलश दर्शनासाठी काही मिनिटे ठेवले जातील. मग पिलार जंक्शनहून मळा पणजी येथे सातच्या सुमारास अस्थिकलश आणले जातील. साडेसात वाजता पणजीतील भाजप कार्यालयात हे अस्थिकलश ठेवले जातील, असे तानावडे यांनी सांगितले.
23 रोजी सकाळी नऊ वाजता पर्वरी पीडीए कॉलनी येथे अस्थिकलश ठेवले जातील. मग कळंगुट, शिवोली, मांद्रे, पेडणो, म्हापसा अशा ठिकाणी अस्थिकलश लोकांच्या दर्शनासाठी ठेवले जाणार आहेत. सार्वजनिक दर्शनाच्या कार्यक्रमात कुणीही सहभागी होऊ शकतात. याच दिवशी दक्षिण गोव्यातही अस्थिकलश दर्शनाचे कार्यक्रम सर्वत्र होतील. 24 रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत पणजीतील कॅप्टन ऑफ पोर्ट जेटीकडे मांडवी नदीत अस्थिविसजर्नाचा कार्यक्रम होईल, असे तानावडे यांनी जाहीर केले. याचप्रमाणे त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता कुठ्ठाळी फेरी धक्क्याकडून फेरीबोटीतून अस्थिकलश जुवारी नदीत नेला जाईल व अस्थींचे तिथे विसर्जन केले जाईल.
गोव्यात काँग्रेस पक्षानेही यावेळी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहणारा कार्यक्रम आयोजित केला होता याविषयी पत्रकारांनी विचारले असता, वाजपेयी हे सर्वमान्य असे नेते होते व त्यामुळे काँग्रेसने प्रेमापोटी श्रद्धांजली वाहिली असावी, असे तेंडुलकर म्हणाले. कम्युनिस्टांसह सर्वच पक्षांतील लोकांनी वाजपेयींना श्रद्धांजली वाहिली आहे असे तेंडुलकर यांनी नमूद केले.