अटलसेतू बंद; पुन्हा कोंडी, परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांची गैरसोय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 08:30 AM2023-04-04T08:30:51+5:302023-04-04T08:31:59+5:30
अटलसेतूवरील वाहतूक पुन्हा एकदा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : अटलसेतूवरील वाहतूक पुन्हा एकदा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पुलावरील डांबरीकरणासाठी हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. परंतु, दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या काळात हा निर्णय घेतल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
गोवा पोलिसांच्या वाहतूक विभागाने अटल सेतू वाहतुकीसाठी बंद ठेवला जात असल्याचा आदेश जारी केला आणि आदेश तत्काळ लागू होत असल्याचेही म्हटले होते. परंतु आदेश लागू करण्यापूर्वीच दुपारीच मांडवीच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यावर वाहतूक तुंबली होती. पर्वरीला तर दीड तास वाहतूक ठप्प झाली. रुग्णवाहिकाही त्यात अडकल्या होत्या. त्याचबरोबर पणजीच्या बाजूच्या रस्त्यावरील वाहतूकही खोळंबली होती.
सहकार्याचे आवाहन
वाहतूक अधीक्षक बोसुट सिल्वा यांनी अटल सेतू पूर्णपणे बंद राहणार असल्याचा आदेश जारी करतानाच लोकांना सहकार्य करण्याचे आवाहनही केले आहे. कारण या आदेशाचे उल्लंघन केल्यास वाहतुकीचा खोळंबा होऊन लोकांना त्रास होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
विद्यार्थ्यांना टेन्शन
दहावीच्या परीक्षा सुरु असताना हा पूल बंद ठेवण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. चार दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दहावीची परीक्षा १ एप्रिलपासून सुरु होत असल्याची आपल्याला जाणीव असल्याचे सांगितले होते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी अटल सेतू पूर्णपणे बंद ठेवणार नाही, असे म्हटले होते.
द्राविडी प्राणायाम
अटल सेतू बंद झाल्यामुळे गैरसोय वाढणार आहे. परंतु, तत्पूर्वी पणजीत येणाऱ्यांना रोज गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. स्मार्ट सिटी बनविण्यासाठी पणजीतील रस्ते फोडले आहेत. अनेक शाळा, महाविद्यालयांसमोर फोडाफोडी करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राकडे जाण्यासाठी द्राविडी प्राणायाम करावा लागत आहे. त्यात आता अटल सेतू पुन्हा बंद केल्याने कोंडीत आणखी भर पडणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"