राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची संधी घेत खेळाडूंनी आपले क्रीडा कौशल्य विकसित करावे; मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत
By समीर नाईक | Published: October 19, 2023 02:53 PM2023-10-19T14:53:06+5:302023-10-19T14:53:13+5:30
३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला सुरुवात
पणजी: ताळगाव येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम येथे बहुप्रतिक्षित ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला गुरुवारपासून बॅडमिंटन खेळाने सुरुवात झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते.
मुख्यमंत्र्याच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळी त्यांच्यासोबत क्रीडामंत्री गोविंद गावडे, ताळगावच्या आमदार जेनिफर मोंसेरात, वस्कोचे आमदार कृष्णा साळकर, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सदस्य अमिताभ शर्मा, क्रीडा सचिव स्वेतिका सच्चन, गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या संचालक
डॉ. गीता नागवेंकर,जिल्हा पंचायत सदस्य शायनी डी ऑलिव्हेरा आणि सांताक्रुझच्या सरपंच जेनिफर डी ऑलिव्हेरा व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यात राष्ट्रिय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाचे स्वप्न अखेर खरे झाले. गेल्या कित्येक वर्षांपासून या स्पर्धेच्या आयोजनासाठी आम्ही तयारी करत होतो, अखेर तो दिवस उजाडला आहे. एक ध्येय, एक ध्येय हे लक्षात घेत २६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या स्पर्धेचा अधिकृत उद्घटन होणार आहे, असे यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान उपस्थित राहणार असल्याने खेळाडूंमध्ये वेगळी ऊर्जा निर्माण होणार आहे. आम्ही अमच्यातर्फे सर्वोच्च प्रदान केले आहे. देशभरातील खेळाडूंनी या मिळालेल्या व्यासपीठाचा वापर करून आपले कौशल्य विकसित करावे, तसेच भविष्यात होणाऱ्या आशियायी स्पर्धा, कॉमनवेल्थ गेम्स, ऑलिम्पिक सारख्या जागतिक स्तरावरील स्पर्धेत सहभागी होत, देशासाठी पदके मिळवून देण्यावर भर द्यावा, असे डॉ. सावंत यांनी पुढे सांगितले.
देशासाठी आणि गोव्यासाठी हा खरोखरच अभिमानाचा क्षण आहे. देशभरातील क्रीडापटू, अधिकारी, प्रतिनिधी यांचे मी राज्याच्या वतीने स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदृष्टी असलेले नेते आहे. त्यांनी नेहमीच क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन दिले आहे. तसेच जागतिक स्तरावर स्तरावर भारतीय खेळाडूंची कामगिरी चांगली व्हावी यासाठी अनेक योजना राबवल्या आहे. एक उत्कृष्ट दृष्टी मिळाली आहे आणि प्रत्येक खेळाडूला यासाठी प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्याच मारगदर्शनाखाली आम्ही योग्य रित्या पुढे जात आहोत. त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की
क्रीडा क्षेत्रात आमचा देश पुढे जात आहे, असे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी यावेळी सांगितले.
उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, क्रीडा मंत्री गोविंद गावडे, ताळगावच्या आमदार जेनिफर मोंसेरात, व वस्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी बॅडमिंटन खेळून आपले कौशल्य दाखवून दिले. तसेच ३७ व्य राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे शुभंकर असलेल्या मोगा यांनी उपस्थिती लावल्याने स्टेडियममध्ये उपस्थित असलेले विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह पाहायला मिळाला. नंतर याच ठिकाणी बॅडमिंटन क्रीडा प्रकारच्या सामन्यांना सुरुवात झाली. गोव्याचा संघ खेळत असल्याने प्रेक्षकांनी देखील बॅडमिंटनपटूंना प्रोत्साहन देत त्यांचे मनोबल उंचावले.