गोव्यात 9 वी आणि 11 वीच्या नापास विद्यार्थ्यांना एटीकेटीचा प्रस्ताव फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 12:50 PM2019-09-18T12:50:55+5:302019-09-18T12:51:16+5:30
शालांत व उच्च माध्यमिक मंडळाच्या सर्वसाधारण सभेत विविध निर्णय
पणजी : गोव्यात इयत्ता नववी आणि अकरावीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना एटीकेटी देऊन पुढील इयत्तेत ढकलण्याचा प्रस्ताव गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळाच्या सर्व साधारण सभेत फेटाळून लावण्यात आला. यामुळे एटीकेटीच्या आशा आता मावळल्या आहेत.
गोवा बोर्डाचे चेअरमन रामकृष्ण सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रस्ताव १० विरुद्ध १२ मतांनी फेटाळला. प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी या प्रस्तावाला विरोध केला. नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांना एटीकेटी देऊन अनुक्रमे दहावी-बारावीला बसण्याची संधी दिल्यास शिक्षणाचा दर्जा आणखी खालावेल, असे मत काही मुख्याध्यापकांनी व्यक्त केले. विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून वीजमंत्री निलेश काब्राल हे आमसभेचे सदस्य आहेत. नापास विद्यार्थ्यांना एटीकेटी बहाल करण्यास ते अनुकूल होते त्यासाठी हवे तर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्रही उघडू असे त्यांचे म्हणणे होते. परंतु शिक्षक, प्राचार्य, मुख्याध्यापकांनी ते योग्य होणार नसल्याचे मत व्यक्त केले. शिक्षण हक्क कायद्याखाली इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास न करण्याच्या धोरणामुळे आधीच शिक्षणाची वाताहात झाली आहे, त्यात नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना ही संधी दिल्यास दर्जा आणखी खाली येईल, असे शिक्षकांचे म्हणणे होते. ४० सदस्यीय आमसभेत २७ जणांनी उपस्थिती लावली. एटीकेटी देण्याच्या ठरावाच्या बाजूने १० तर विरोधात १२ जणांनी मतदान केले. ५ जणांनी तटस्थ भूमिका घेतली.
येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता नववीसाठी खगोलशास्त्र आणि इयत्ता अकरावीसाठी विज्ञान शाखेत मूलभूत जैवतंत्रज्ञान हे ऐच्छीक विषय लागू करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी शिक्षक भरतीचीही तरतूद केली जाईल. २७ फेब्रुवारी २०२० रोजी बारावीची तर १ एप्रिल २०२० रोजी दहावीची परीक्षा होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी चालू असून वास्तविक 15 सप्टेंबरपर्यंत मुदत संपली होती ती आता वाढवून 25 सप्टेंबरपर्यंत करण्यात आली आहे.