गोव्यात एटीएम सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, धारगळमध्ये 2 एटीएम फोडून 32 लाख रुपये लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 04:44 PM2017-12-04T16:44:41+5:302017-12-04T16:46:32+5:30
उत्तर गोव्यात एटीएम फोडून चोरी करण्याचे प्रकार वाढले आहेत. मागील तीन महिन्यात किमान चार एटीएम फोडण्याच्या प्रयत्न झाला.
म्हापसा : उत्तर गोव्यात एटीएम फोडून चोरी करण्याचे प्रकार वाढले आहेत. मागील तीन महिन्यात किमान चार एटीएम फोडण्याच्या प्रयत्न झाला. सोमवारी पहाटे पेडणे तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग 17 ला लागून असलेली दोन एटीएम धारगळ येथील फोडून चोरट्यांनी 32 लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. वाढत्या या घटनांमुळे एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सुमारे तीन महिन्यापूर्वी पेडणे तालुक्यातील आगरवाडा येथील स्टेट बँक आॅफ इंडियाचे एटीएम अंदाजीत 18 लाख रुपयांसहित चोरुन नेण्यात आले होते. या घटनेनंतर मागील दीड महिन्यापूर्वी पणजीत दोन एटीएममधून चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्नसुद्धा झाला होता. पहिला प्रयत्न सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आलेला तर त्यानंतर काही दिवसात पणजीतील बस स्थानकावरील एटीएमात चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न झालेला. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आलेली.
सोमवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमाराला धारगळ येथील जुन्या टोलनाक्यापासून सुमारे २०० मीटर अंतरावरील राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या सोहम हरमलकर यांच्या इमारतीमधील स्टेट बॅँक आॅफ इंडियाचे एटीएम फोडून चोरट्यांनी सुमारे १७ लाख रुपये लंपास केले. तर येथूनच अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या कॉर्पोरेशन बॅँकेचे एटीएम फोडून सुमारे १५ लाख रुपयांची चोरी झाली. चोरट्यांनी दोन्ही एटीएमातून ३२ लाख रुपयांची रोखड लंपास केली आहे.
याबाबत पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली. या इमारतीचे मालक हरमलकर यांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. त्यात चार माणसे एटीएम फोडताना दिसत आहेत; परंतु स्पष्ट चेहरे दिसत नाहीत. सीसीटीव्हीचे फोटो तज्ज्ञ कमलेश गावस यांना खास बोलावून त्याची पाहणी केली; परंतु चेहरे मिळणे मुश्किल झाले. दोन्ही घटनामध्ये चोरटे समान असल्याचा कयास पोलिसांचा आहे.
आज सकाळी एसबीआयची गाडी कॅश घेऊन ९.१५ च्या दरम्यान जेव्हा एटीएमकडे आली तेव्हा चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी आपल्या वरिष्ठांना फोन करून व नंतर पोलिसांना बोलाविले. पोलीस चौकशीसाठी बाहेर पडत असतानाच पोलिसांना कॉर्पोरेशन बॅँकेचे एटीएम फोडल्याची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक चोडणकर हे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी दोन्ही ठिकाणची पाहणी केली. घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी ठसे तज्ज्ञ व इतर आवश्यक त्या बाबीची तपासणी केली व काही महत्त्वपूर्ण वस्तू ताब्यात घेतल्या. एटीएम गॅस कटरने कापल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले. पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनंत गावकर पुढील तपास करीत आहेत.