डीजीपींवर घणाघात; घर पाडण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याने सर्वत्र संताप

By किशोर कुबल | Published: June 28, 2024 03:48 PM2024-06-28T15:48:57+5:302024-06-28T15:49:12+5:30

- बडतर्फ करून सहआरोपी करण्याची जोरदार मागणी

Attack on DGPs There is widespread anger as police officers are pressured to demolish the house | डीजीपींवर घणाघात; घर पाडण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याने सर्वत्र संताप

डीजीपींवर घणाघात; घर पाडण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याने सर्वत्र संताप

किशोर कुबल/पणजी

पणजी : आसगांव येथे आगरवाडेकर कुटुंबियांचे घर पाडण्यासाठी गोव्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी दबाव आणल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट पोलीस निरीक्षकाने केल्यानंतर गोव्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. जसपाल सिंग यांना त्वरित निलंबित करून या प्रकरणात सह आरोपी करा, अशी मागणी प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने केली आहे.

सिंग यांचे सर्व फोन कॉल्स तपासा. त्यांना सेवेतून बडतर्फ करून संशयितांच्या यादीत टाका व हे प्रकरण सीबीआयकडे सोपवा, अशी मागणी विरोधी आमदार कार्लुस फेरेरा यांनी केली आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन डीजीपींच्या कृतीवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ' गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांनी पोलीस निरीक्षकाच्या जबानीची गंभीर दखल घेऊन सिंग यांना या प्रकरणात सहआरोपी करावे तसेच त्यांना सेवेतून निलंबित करण्याचा आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाकडून आणावा, नपेक्षा आम्ही केंद्रीय गृह मंत्रालयाला पत्र लिहून तशी मागणी करणार आहोत.

सुपारी घेणारे खाते : सरदेसाई
गोव्याचे पोलीस खाते आता अधिकृत सुपारी घेणारे खाते बनले आहे, असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे. जनतेचा पोलीस अधिकाऱ्यांवरील विश्वास आता उडाला असल्याचे ते म्हणाले.

केवळ ट्विट नको, कृती करा - उत्पल परीकरांनी सुनावले
उत्पल पर्रीकर यांनीही भाजपवर घणाघात केला आहे. डीजीपींच्या ट्विटला प्रत्युत्तत्र व आव्हान देताना उत्पल यांनी असे म्हटले आहे की 'पोलिसांवर विश्वास ठेवा,' असे केवळ ट्विट करून भागणार नाही तर डीजीपींकडून प्रत्यक्ष कृती हवी.' निरीक्षकांच्या जबानीने लोकांचा पोलीस अधिकाऱ्यांवरील विश्वास उडालेला आहे. राज्यात कायदा अस्तित्वात नाही, हे यावरून सिद्ध होते. गुन्हेगारांचा विश्वास दुणावला आहे. गोवेकरांचे भवितव्य भविष्यात काय असेल, हे यावरून स्पष्ट होते. गोवेकरांसाठी ही धोक्याची घंटा आहे, असे उत्पल म्हणाले.

Web Title: Attack on DGPs There is widespread anger as police officers are pressured to demolish the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा