न्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न; पर्वरी ते म्हापसा केला पाठलाग, दोघा संशयितांना तत्काळ अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 09:03 AM2023-05-12T09:03:29+5:302023-05-12T09:04:14+5:30
संशयितांनी पर्वरीपासून म्हापशापर्यंत न्यायाधीशांचा पाठलाग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
म्हापसा : मालमत्तेसंदर्भातील एका प्रलंबित सुनावणी प्रकरणात म्हापसा न्यायालयातील महिला कर्मचाऱ्याला धमकी देऊन नंतर या प्रकरणाशी निगडित असलेल्या न्यायाधीशांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. संशयितांनी पर्वरीपासून म्हापशापर्यंत न्यायाधीशांचा पाठलाग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी सायतो लोबो व झेवियर लोबो (दोघेही सांवतावाडी-कळंगुट) यांना अटक केली आहे. यासंबंधी येथील प्रथम वर्ग न्यायालयातील न्यायाधीशांनी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तक्रार बुधवारी रात्री दाखल करण्यात आली होती. सुरुवातीला महिला कर्मचाऱ्याला न्यायालयाच्या आवारात धमकी देण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाशी संबंधित असलेल्या न्यायधीशांनाही टार्गेट करून न्यायालयातून पर्वरी येथील आपल्या गाडीने घरी जात असताना त्यांचा पाठलाग केला. मालमत्तेसंदर्भात प्रलंबित याचिकेवरून हा प्रकार घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी दोघा संशयितांची गोमेकॉत वैद्यकीय तपासणी केली असून अहवाल येणे बाकी आहे. त्या दोघांविरुद्ध भा.दं.सं. ३५३, ५०६- (३४) कलमाखाली गुन्हा नोंदवला असून निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक प्रणिता मांद्रेकर पुढील तपास करीत आहेत.
कोर्ट कामकाज संपेपर्यंत दबा धरून...
मालमत्ता प्रकरण अंगलट आल्यामुळेच न्यायाधीशांना आणि न्यायालयीन कर्मचायांना धडा शिकवायचा निर्धार संशयितांनी केला होता. कारण म्हापसा प्रथमवर्ग न्यायाधीशांमुळेच मालमत्तेवर पाणी सोडण्याची वेळ आली. अशा त्यांची धारणा बनली होती. त्यामुळे दोघेही संशयित बुधवारी न्यायालयाचे कामकाज संपेपर्यंत संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत दबा धरून बसले होते. न्यायाधीश व कर्मचारी न्यायालयातून बाहेर पडण्याची ते वाट पाहत होते आणि संधी मिळताच त्यांनी पाठलाग सुरू केला.
'त्या' घटनेची आठवण
प्रत्यक्ष न्यायाधीशाला धमक्या देण्याचे आणि पाठलाग करण्याचे प्रकार गोव्यात घडू लागल्यामुळे ही चिंताजनक बाब बनली आहे. यापूर्वीही न्यायाधीशांना " चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला होता. प्रत्यक्ष न्यायालयातच चोरी करण्याचा कारनामा करणाऱ्या मुजाहीद शेख नावाच्या वकिला न्यायाधीशाला चाकूचा धाक दाखवून ४० लाख रुपयांच मागणी केली होती. त्यानंतर त्याला अटकही करण्यात आली होती.