बंगला लुटण्याचा प्रयत्न; पोलिसांवर झाडल्या गोळ्या, सांकवाळ येथील थरार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 12:44 PM2023-05-23T12:44:32+5:302023-05-23T12:46:25+5:30
चोरट्यांकडून होमगार्ड जखमी; तिघेही पसार
लोकमत, वास्को: सांकवाळ एमईएस कॉलेजजवळील एका बंगल्यात चोरीच्या उद्देशाने आलेल्या तिघांना पकडण्यासाठी गेलेल्या जखमी पोलिसांवरच प्रल्हाद नाईक एका चोरट्याने दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी होमगार्ड प्रल्हाद नाईक यांच्या गुडघ्याला लागून गेल्याने ते जखमी झाले तर दुसरी पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल नाईक यांच्या डोक्यावरून गेल्याने ते सुदैवाने बचावले. सोमवारी पहाटे हा थरार घडला.
पोलिस उपअधीक्षक सलीम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांकवाळ- एमईएस कॉलेजजवळील परिसरात डॉ. आमोणकर यांचा बंगला आहे. त्यांचे कुटुंबीय गोव्याबाहेर असल्याने हा बंगला बंदच असतो. पहाटे २ च्या सुमारास तीन चोरटे डॉ. आमोणकर यांच्या बंगल्याचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे एका शेजाऱ्याला दिसून आले. त्याने त्वरित पोलिसांना ही माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल नाईक यांनी आपल्या पथकासह धाव घेतली.
यावेळी दोघेजण दरवाजा फोडण्याच्या प्रयत्न करत होते तर एकजण बाहेरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी बाहेर उभा होता. अचानक पोलिसांचे वाहन येत असल्याचे दिसताच त्याने आपल्या साथीदारांना माहिती दिली. त्यानंतर तिघांनीही बंगल्याच्या कुंपणावरून बाहेर उडी मारून दुचाकीवरून पळ काढला. चोरटे पळून जात असल्याचे दिसताच पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. त्यावेळी एका चोरट्याने पोलिसांच्या दिशेने पिस्तूलमधून दोन गोळ्या झाडल्या.
पहिली गोळी पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल नाईक यांच्या डोक्यावरून गेल्याने ते बचावले. त्यानंतर चोरट्याने झाडलेली दुसरी गोळी रस्त्यावर लागून होमगार्ड प्रल्हाद नाईक याच्या गुडघ्याला लागल्याने ते जखमी झाले.
सर्वत्र नाकाबंदी
पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल नाईक यांनी तातडीने घटनेची माहिती वायरलेसवरून सर्वांना दिली. त्यानंतर विविध भागांत गस्तीवर असणाया पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी करण्यास सुरुवात केली. पळून जाणाच्या चोरट्यांना नाकाबंदी केल्याचे दिसून येताच त्यांनी रस्त्यातच दुचाकी टाकून झुडपातून पळ काढला. चोरीसाठी वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली असून ती चोरीची असल्याचे तपासात समोर आले आहे.
दुसऱ्यांदा चोरी
डॉ. आमोणकर यांचे कुटुंब काही वर्षांपासून विदेशात आहे. त्यामुळे त्यांचा बंगला बंदच असतो, अशी माहिती नातेवाईक यश केरकर यांनी दिली. तीन वर्षांपूर्वी या बंगल्याच्या खिडकीचे ग्रील्स कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला होता तसेच बंगल्याच्या देखभालीसाठी असलेल्या कामगारांची खोली चोरट्यांनी बाहेरून बंद केली होती. त्यावेळी चोरट्यांना काहीही सापडले नसल्याची माहिती केरकर यांनी दिली.
हे तेच तिघे असावेत...
सांकवाळ येथील बंगल्यात चोरीसाठी आलेले तिघे अन्य प्रकरणांत गुंतल्याचा संशय पोलिसांनी आहे. सांत जासिंन्तो येथे दुचाकीवरून आलेले तिघे सोनसाखळी घेऊन पसार झाले. लोटली येथेही दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी ठरला. दोन्ही घटनांत तिघांचा समावेश असल्याने सांकवाळ येथील चोरटे तेच असावेत, असा पोलिसांना संशय आहे.
- पोलिसांना घटना स्थळावरून कुन्हाड, स्पॅनर, स्क्रू ड्रायव्हर आणि फोडलेली दोन कुलूपे जप्त केले आहेत. सोमवारी पहाटेपासूनच पोलिस चोरट्यांना गजाआड करण्यासाठी शोध घेत आहेत.
- वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक डायगो ग्राशियस आणि पोलीस पथकाने त्वरित घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. घटनास्थळावर श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांना बोलवून पुरावे गोळा करण्यात आले आहेत.
- पोलिसांवर झाडलेल्या दोन गोळ्यांपैकी एकाचे "कवर पोलिसांना घटनास्थळ परिसरातून सापडलेले आहे. वेर्णा पोलिस
तपास करत आहेत.