ड्रग्स प्रकरण : ख्रिस्तियन कोलरचे गेल्या पाच वर्षापासून गोवा कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 05:52 PM2018-12-04T17:52:20+5:302018-12-04T17:54:35+5:30
हणजुणे येथे भाड्याच्या घरात ड्रग्सची प्रयोगशाळा सुरु केलेला ख्रिस्तियन कोलर हा ऑस्ट्रीयन ड्रग व्यावसायिक गेल्या पाच वर्षापासून गोव्यात येत होता.
सुशांत कुंकळयेकर
मडगाव - हणजुणे येथे भाड्याच्या घरात ड्रग्सची प्रयोगशाळा सुरु केलेला ख्रिस्तियन कोलर हा ऑस्ट्रीयन ड्रग व्यावसायिक गेल्या पाच वर्षापासून गोव्यात येत होता. गोव्यात विदेशी ग्राहकांना हेरुन तो अंमलीपदार्थ त्यांना पुरवित होता अशी माहिती उघड झाली आहे. याच संशयिताला यापूर्वी 2008 साली त्याच्या मायदेशातही अशाच प्रकारच्या गुन्ह्यात अटक झाली होती.
हणजुणे पोलीस स्थानकाचे निरीक्षक सी.एल. पाटील यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, गोव्यात पर्यटन मौसम सुरु झाल्यानंतर 2 ऑक्टोबरला ख्रिस्तियन गोव्यात उतरला होता. हणजुणे येथे एक भाड्याचे घर घेऊन त्याने त्यात सिंथेटीक ड्रग्स बनविण्याची प्रयोगशाळा सुरू केली होती. 29 नोव्हेंबर रोजी हणजुण पोलिसांनी त्याच्या या घरावर धाड घातली असता, त्यांना या प्रयोगशाळेत 21 वेगवेगळ्या प्रकारची रसायने तसेच अंमलीपदार्थ असा एकूण एक कोटीचा माल सापडला होता. या धाडीत पोलिसांना 2 इंडक्शन प्लेटस्, 1 रेफ्रिजरेटर तसेच काही जार्स सापडली होती.
पाटील यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मागची पाच वर्षे प्रत्येक पर्यटन मौसमाला ख्रिस्तियन गोव्यात येत होता. सुरुवातीला त्याने गोव्यात ड्रग पेडलर म्हणून काम केले. केवळ विदेशी पर्यटकांनाच तो अंमलीपदार्थ पुरवित असे. मात्र बाहेरुन अंमलीपदार्थ मिळविणे कठीण झाल्यामुळेच यावेळी त्याने स्वत:च प्रयोगशाळा स्थापून अंमलीपदार्थ तयार करण्याचे काम सुरू केले.
वास्तविक केवळ संशयावरुन हा संशयित पोलिसांच्या ताब्यात आला. गस्तीवर असलेल्या हणजुणे पोलिसांनी त्याला संशयावरुन ताब्यात घेतले असता त्याच्याकडे सुमारे तीन लाखांचे अंमलीपदार्थ सापडले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्स सापडल्यानंतर पोलिसांनी तो राहत असलेल्या घराची झडती घेतली असता, पोलिसांच्या हाती हे प्रयोगशाळेचे मोठे घबाडच लागले.