गाड्यांवरील खाद्यपदार्थ खाणे टाळा; नोटीसद्वारे गोमेकॉने कर्मचाऱ्यांना बजावले, नंतर नोटीस घेतली मागे
By पूजा प्रभूगावकर | Published: February 17, 2024 05:05 PM2024-02-17T17:05:28+5:302024-02-17T17:07:10+5:30
गोमेकॉच्या या भूमिकेबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पूजा नाईक प्रभूगावकर,पणजी : बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळाबाहेरील गाड्यांवर खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे पाणी वापरत असल्याचा संशय आल्याने तेथील खाद्यपदार्थ खाणे टाळावे, असे गोमेकॉने नोटीसद्वारे आपल्या कर्मचाऱ्यांना बजावले आहे. नंतर मात्र ही नोटीस मागे घेतली. त्यामुळे गोमेकॉच्या या भूमिकेबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
बांबोळी येथील सुपरस्पेशालिटी ब्लॉक तसेच गोमेकॉ इस्पितळाबाहेर अनेक खाद्यपदार्थ विक्रीचे गाडे, दुकाने, कॅंटीन आहेत. गोमेकॉच्या कर्मचाऱ्यांसह या इस्पितळात तपासणीसाठी येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक या गाड्यांवरील हे खाद्यपदार्थ खातात. मात्र, आता हे पदार्थ तयार करण्यासाठी उद्यानातील नळाचे अर्थात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे पाणी वापरले जात असल्याचा संशय
काहींनी व्यक्त केला.
गोमेकॉच्या नजरेस ही बाब आणून देण्यात आल्यानंतर गोमेकॉने हे खाद्यपदार्थ खाताना, तसेच तेथील पाणी पिताना खबरदारी घ्यावी, असे आपल्या कर्मचाऱ्यांना नोटीसद्वारे बजावले होते. मात्र सदर नोटीस अचानक मागे घेतली.