खाण घोटाळ्यातील मनी लाँडरिंग प्रकरणात कारवाईसाठी टाळाटाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2018 09:23 PM2018-01-28T21:23:56+5:302018-01-28T21:24:05+5:30
खाण घोटाळ्यात अडकलेला ट्रेडर इम्रान खान याची दुबितीतही बँक खाती असल्याचे उघडकीस आल्यामुळे त्याची मनी लॉंडरिंग प्रकरणात चौकशी करण्यात यावी, अशी सूचना करणारे पत्र विशेष तपास पथकाने अंमलबजावणी खात्याला (ईडी) लिहिले होते.
पणजी: खाण घोटाळ्यात अडकलेला ट्रेडर इम्रान खान याची दुबितीतही बँक खाती असल्याचे उघडकीस आल्यामुळे त्याची मनी लॉंडरिंग प्रकरणात चौकशी करण्यात यावी, अशी सूचना करणारे पत्र विशेष तपास पथकाने अंमलबजावणी खात्याला (ईडी) लिहिले होते. परंतु अंमलबजावणी विभागाकडून अद्याप त्या संबंधी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
खाण घोटाळा प्रकरणातील संशयित ट्रेडर इम्रान खानचे अनेक व्यवहार एसआयटीने उघडकीस आणले आहेत. त्याची दुबईत असलेल्या बँक खात्याची माहितीही उघडकीस आली आहे. हे प्रकार मनी लॉंडरिंगच्या गुन्ह्यात येत आहेत. मनी लाँडरिंग हा एसआयटीच्या अखत्यारीच्या बाहेरील विषय असून अंमलबजावणी विभागच या बाबतीत कारवाई करीत असतो. त्यामुळे तपासाचा हा भाग अंमलबजावणी विभागाकडे सोपविण्यात यावा, यासाठी एसआयटीकडून हे पत्र लिहिण्यात आले होते. अंमलबजावणी खात्याला पत्र पाठवून ३ आठवडे उलटले तरी अद्याप कारवाई झाली होत नसल्यामुळे या प्रकरणात अंमलबजावणी खात्याला रस नसल्याचाही तर्क काढला जात आहे.
इम्रान खानकडून करण्यात आलेल्या सर्व गैरव्यवहारांचे पुरावे एसआयटीकडे आहेत. विदेशात खाती असण्याबरोबरच इतर त्याचे इतर अनेक गैरव्यवहार आढळले आहेत. एमएमआरडी कायद्यानुसार एखाद्याला देण्यात आलेले खाण लीज हे लीजधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर होण्यासाठी काही कायदेशीर प्रक्रिया करावी लागते. ती न करता त्या खाणीचा पावर आॅफ अॅटर्नी कुणीही देऊ शकत नाही आणि घेऊ शकत नाही. परंतु इम्रान खानने ते केले आहे. इमिलिया फ्रिग्रेडो यांच्या खाण लिजाची बेकायदेशीरपणे पावर आॅफ अॅटर्नी घेऊन उत्खनन केल्यामुळे हे मंजूर झालेले खाण लीज काढून घेण्याची शिफारस केली आहे.
लीजच्या करारात तशी तरतूद असल्याचेही म्हटले आहे. वनखात्याचा व इतर आवश्यक परवाने न घेता आतापर्यंत बेकायदेशीरपणे उत्खनन करून इम्रानने कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केला आहे. वसुलीचे अधिकारी हे एसआयटीला नाहीत, परंतु खाण खात्याला आहेत. त्यामुळे हे पैसे वसूल करून घेण्यात यावेत, अशा आशयाचे पत्र खाण खात्यालाही एसआयटीकडून लिहिण्यात आले आहे. खाण खात्याकडूनही कारवाईची अपेक्षा असून, अद्याप या प्रकरणात खाण खात्याने कोणती कारवाई केली याची माहिती उपलब्ध झालेली नाही.