गोव्यात वाघांचा पुरस्कार बनला मोठ्या वादाचा विषय, नामदेव ढसाळांच्याही कवितांचे दाखले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 10:44 AM2017-09-28T10:44:14+5:302017-09-28T10:44:40+5:30

गोव्यासह महाराष्ट्रातही परिचित असलेले साहित्यिक विष्णू वाघ यांच्या कवितासंग्रहावरून आणि नियोजित पुरस्कारावरून गोव्यात मोठा वैचारिक वाद सुरू आहे.

The award of tigers in Goa has been a matter of great debate, Namdev Dhasal's poems | गोव्यात वाघांचा पुरस्कार बनला मोठ्या वादाचा विषय, नामदेव ढसाळांच्याही कवितांचे दाखले

गोव्यात वाघांचा पुरस्कार बनला मोठ्या वादाचा विषय, नामदेव ढसाळांच्याही कवितांचे दाखले

Next

पणजी - गोव्यासह महाराष्ट्रातही परिचित असलेले साहित्यिक विष्णू वाघ यांच्या कवितासंग्रहावरून आणि नियोजित पुरस्कारावरून गोव्यात मोठा वैचारिक वाद सुरू आहे. विशेष म्हणजे या वादात आता प्रथमच ख्रिस्ती धर्मियांमधील काही वकिल, डॉक्टर व लेखकांनी उडी टाकली आहे. काहींनी तर नामदेव ढसाळांच्याही कवितांचे दाखले देऊन वाघांच्या काही आक्षेपार्ह कवितांचे तोकडे समर्थन चालविले आहे.
एखाद्या कवितासंग्रहावरून वैचारिक वाद होणे आणि शेवटी त्या कवितासंग्रहास पुरस्कार देण्याचा सरकारी विचार लांबणीवर पडणे असा अनुभव गोव्याला गेल्या पन्नास वर्षांत आता प्रथमच येत आहे. नाटक, कविता व अन्य साहित्य प्रकार हाताळलेले वाघ आजारी आहेत. त्यांनी यापूर्वी लिहिलेला व प्रकाशित केलेला सुदिरसुक्त नावाचा कवितासंग्रह हा बहुतांश वाचकांच्या आता लक्षात आला. गोवा सरकारच्या कोंकणी अकादमीने या पुरस्काराला पुरस्कार देण्याचा प्रयत्न केल्यानंतर वादाची ठिणगी पडली. आता या ठिणगीचे रुपांतर साहित्य वर्तुळात आणि मराठी व कोंकणीप्रेमींमध्ये वणव्यात झाले आहे.
गोव्यात उच्चवर्णियांनी अशिक्षित व  समाजाच्या निम्नस्तरातील घटकांचे कायम शोषण केले अशा प्रकारचा सूर अतिशय स्पष्टपणे वाघ यांच्या सुदिरसुक्त कवितासंग्रहामधून व्यक्त होत आहे. याला गोव्यातील अनेक लेखक, कवी व सुजाण वाचकांनी आक्षेप घेतला. यामुळे समाजातील दोन जातींमध्ये दुही माजू शकते असा विचार उदय भेंब्रे व अन्य काही जाणकारांनी लेखांमधून मांडला आहे. 
काही कवितांमध्ये थेट शिव्यांचा वापर केल्याने या कवितासंग्रहावर अश्लीलतेचा ठपकाही काही लेखक व कवीनी जाहीरपणे ठेवला आहे. नंदकुमार कामत, क्लिओफात कुतिन्हो, राधाराव ग्राषियस अशा काही लेखकानी व वकिलांनी आणि खुद्द प्रकाशकाने या कवितासंग्रहाचे समर्थन केले आहे. काहीजणांनी सोशल मिडियावरून वाघ यांच्या कवितांचे आणि त्यानी लावलेल्या सुरांचे पूर्ण समर्थन करताना महाराष्ट्रातील दलित कवी नामदेव ढसाळ यांच्या कवितांचेही दाखले दिले आहेत. मात्र ढसाळ यांच्या कवितांशी वाघांच्या साहित्याची तुलना करता येणार नाही असे कोकणी साहित्यातील काही मान्यवरांचे म्हणणे आहे. वाघानी लिहिलेल्या काही कविता कुटुंबांमध्ये एकत्र बसून कुणीच वाचू शकणार नाही असा आक्षेप बहुतेक कोंकणी कवींनी घेतला आहे.
सुदिरसुक्त कवितासंग्रहाचे समर्थन करणारे लेखक एन. शिवदास, रोहिदास शिरोडकर, भाऊ नाईक आदी काहीनी नुकताच वाघांच्या त्या आक्षेपार्ह कवितांचे जाहीरपणे वाचन करणारा कार्यक्रम घडवून आणला.
वाघ यांच्या कवितासंग्रहावरून वाद झाल्याने आता कोंकणी अकादमी पुरस्कार देण्याचा विषय पुढे नेऊ शकलेली नाही. आता निर्णयासाठी या विषयाची फाईल अकादमीकडून  मुख्यमंत्र्यांकडे पाठविली जाणार असल्याचे सरकारी सुत्रांनी सांगितले.
 

Web Title: The award of tigers in Goa has been a matter of great debate, Namdev Dhasal's poems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.