मराठी भाषा अन्यायाविरुद्ध आता जागरण अभियान; राज्यात २६ एप्रिलपासून निर्धारसभा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 12:15 IST2025-04-09T12:15:09+5:302025-04-09T12:15:09+5:30
सुभाष वेलिंगकर; मांद्रेतून होणार सुरुवात

मराठी भाषा अन्यायाविरुद्ध आता जागरण अभियान; राज्यात २६ एप्रिलपासून निर्धारसभा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गेल्या ४० वर्षापासून मराठीवर होत असलेल्या अन्यायाबाबत संपूर्ण गोव्यात 'जनजागरण अभियान' शनिवार, दि. २६ एप्रिलपासून सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मराठी राजभाषा निर्धार समितीने घेतला आहे. गोमंतक मराठी अकादमीच्या मराठी भवनमध्ये मराठी राजभाषा निर्धार समितीच्या सुकाणू मंचच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. व्यासपीठावर राज्य निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर, ज्येष्ठ मार्गदर्शक गो. रा. ढवळीकर उपस्थित होते.
यावेळी प्रा. वेलिंगकर म्हणाले की, जनजागरण अभियानाचा श्रीगणेशा २६ एप्रिलपासून मांद्रेतून करण्याचे ठरले आहे. अभियान व्यापक करण्यासाठी संघटनात्मक रचना १२ सरकारी तालुक्यांऐवजी भौगोलिकदृष्ट्या सोयीचे असे १८ विभाग करून पहिल्या टप्प्यात एप्रिल त्यानंतर मे व जून असे तीन महिन्यात सर्व १८ विभागात मराठीप्रेमींचे विभागवार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत.
सर्वसमावेशक समित्या
या मेळाव्यात सर्वसमावेशक व्यापक विभाग समित्या स्थापन करण्यात येतील. तालुक्यातील प्रमुख सर्व कार्यकर्त्यांकडे सुपूर्द केलेल्या आवाहन पत्रांचे वितरण विभागीय मेळाव्यांतून सुरु करण्यात येईल, असेही वेलिंगकर म्हणाले. यावेळी बैठकीत प्रदीप घाडी आमोणकर, प्रा. नारायण महाले, डॉ. अनुजा जोशी, विजय नाईक, गोविंद देव, प्राचार्य गजानन मांद्रेकर, अनुराधा मोघे, गुरुदास सावळ, नितीन फळदेसाई यांनी सहभाग घेतला.