माय नेम इज नार्वेकर, आय एम नॉट नक्षली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2024 08:06 AM2024-01-16T08:06:05+5:302024-01-16T08:06:16+5:30

निवृत्त झाल्यावर निवांतपणे विश्रांती घ्यायचा माझा विचार होता, पण सद्‌गुरूंच्या (पाटील) प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी परत लिहायला लागलो.

ayodhya ram mandir and controversy | माय नेम इज नार्वेकर, आय एम नॉट नक्षली

माय नेम इज नार्वेकर, आय एम नॉट नक्षली

अॅड. राजेश नार्वेकर, निवृत्त अध्यक्ष प्रशासकीय लवाद

शाहरुख खानचा एक सिनेमा आहे. माय नेम इज खान! त्या सिनेमात धर्मामुळे नायकाला अतिरेकी ठरवण्यात येते, तेव्हा परत परत 'माय नेम इज खान, अॅण्ड आय एम नॉट टेररिस्ट' असे त्याला वारंवार सांगावे लागते.

खूप वर्षापूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट आज आठवला. मागे माननीय मुख्यमंत्र्यांनी गोमंतकात 'नक्षली' आहेत, असे म्हटले तेव्हा काहूर माजले. नेमके कोण नक्षली हे जाहीर करा, असे सगळे विरोधी पक्षातील नेते ओरडू लागले. मुख्यमंत्र्यांनी असे विधान करताच आठवड्याभरात तथाकथित धर्मांतर केल्याच्या आरोपाखाली शिवोलीच्या एका पास्टरला अटक झाली, पण नेमके नक्षली कोण हे जाहीर झाले नाही.

निवृत्त झाल्यावर निवांतपणे विश्रांती घ्यायचा माझा विचार होता, पण सद्‌गुरूंच्या (पाटील) प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी परत लिहायला लागलो, कथा, कविता, लघु कादंबरी, एकांकिका, नाटक, राजकीय प्रहसने, असे सर्व साहित्य प्रकार हाताळून मी मराठी भाषेत नऊ पुस्तके लिहिली आहेत. माझ्या सुदैवाने (आणि वाचकांच्या दुर्दैवाने) ती सगळी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. एक कोकणी साहित्यिक म्हणाले, 'महाठीत' लिहिण्याऐवजी जर मी 'कोंकणी'त लिहिले असते तर साहित्य अकादमी पुरस्कार सहज पदरात पाडून घेणे शक्य होते. आता ते कोकणीवादी खरं बोलत होते की, मुद्दाम मला 'पाइन' बोलत होते हे दामबाबच जाणे!

पण आता मला लिहायची किंवा भाषणे करायची भीती वाटते. आजपर्यंत देवा-धर्मावर खूप लिहिले, पण आता त्यांच्या वाटेला जायचे धारिष्ट्य होत नाही. हल्लीच महाराष्ट्रातील एका राजकारण्याने राम मांसाहारी होता, असे जाहीर विधान केले आणि धर्मरक्षक चवताळले. त्यात 'धर्मरक्षिता' अशा आमच्या सौभाग्यवतीही सामील झाल्या, 'काय हो, रामावर काहीही बोलतो तो. रामाने मांस खाल्ले हे कुणी सांगितले त्याला?' बायकोने मला प्रश्न केला, आयुष्यात अनुभवाने शहाण्या झालेल्या नक्यांपैकी मी एक असल्यामुळे त्या प्रश्नाचे उत्तर देणे मी टाळले.

पण बायकोच्या अंगात विरश्री संचारली, म्हणाली 'माझी आजीसुद्धा रामाची भक्तिभावाने पूजा करायची. राम राया शुद्ध शाकाहारीच होता.' 'राम तुमच्या गावात राहायचा का? तुझी आजी त्याला शाकाहारी जेवण करून द्यायची का? की तो कुणा राजस्थानीच्या 'शुद्ध शाकाहारी' भोजनालयात जेवण करायचा, असे प्रश्न करावेसे वाटले.. पण 'पूर्वानुभव' आठवले आणि गप्प राहिलो. बायकोशी वाद घालण्यात काय अर्थ आहे? न्यायालयात वाद विवाद केल्यास निदान फी चे पैसे तरी मिळतात. आणि वाद कुणा कुणाशी घालणार? काही जण तर 'राम' ही आपलीच मक्तेदारी असल्यासारखे वागतात. मुद्द्यावरून गुद्यावर येतात. मोर्चा काढण्याची, निषेध करण्याची धमकी देतात.

त्या राजकारण्याने वाद विकोपाला जातोय हे लक्षात आल्यावर वाल्मीकी रायायण, ग. दि. मांची कविता 'गीत रायायण' जे कित्येक वर्षांपूर्वी रेडिओवरून प्रसारित झाले होते, त्याचे दाखले देऊन आपले म्हणणे खरे असल्याचे साक्षी पुरावे सादर केले. ते पुरावे पडताळून पाहण्याची तसदी कुणीच घेतली नाही. मी सुद्धा!

देवाचे सोडाच ज्यांना आपण राष्ट्रपुरुष मानतो, त्या शिव छत्रपतींबद्दलही लिहायला, बोलायला मला भीती वाटते. छत्रपतींनी शाहिस्तेखानाऐवजी अफझलखानाची बोटे छाटली, असे जर चुकून मी लिहिले किंवा बोललो तर बोटातील पेनासह माझी बोटे छाटायला 'मावळे' कमी करणार नाहीत. एका इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांने 'शिवाजी अॅण्ड हिज मावळाज' असे न उच्चारता 'शिवाजी अॅण्ड हिज मवालीज' असे उच्चारले तर त्याकाळी प्रेक्षकांनी हसून माझ केले होते. आज तसे घडले तर त्या विद्यार्थ्याच्या वडिलांना 'धर्म विरोधी' ठरवले गेले असते. आजकाल 'जय श्री राम' किंवा 'हर हर महादेव' ऐकले की छातीत धडकी भरते.

श्रीराम, कृष्ण, शिवछत्रपती हे प्रत्येकाच्या हृदयात हवेत. मनात हवेत. त्यांची भक्ती व स्मरण नेहमीच करावे. त्यांच्या नावाने वाद विवाद टाळायला हवेत. हे सगळ्या भक्तांनी व मावळ्यांनी ध्यानात घ्यावे, अशी नम्र विनंती मी हात जोडून (किंवा कुर्निसात करून) करतो. श्रींची इच्छा म्हणा किंवा शिवछत्रपतींची प्रेरणा म्हणा.. पण मनात नसताना हे लेखणीतून उतरले. कोर्ट सोडून मला रस्त्यावर वाद विवाद करण्याची इच्छा नाही, कारण मी नक्षली नाही. 

(टीप : यदा कदाचित नक्षलवादींची नावे सरकारने जाहीर केली आणि त्यात चुकून (किंवा जाणून बुजून) माझे नाव झळकले, तर येत्या २२ जानेवारीला 'जय श्रीराम' असे म्हणण्याची संधी मला मिळेल की, माझेच 'राम नाम सत्य' होईल हे सांगता येत नाही. तेव्हा आजच समस्त वाचकांना 'राम राम' म्हणतो!)

 

Web Title: ayodhya ram mandir and controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा