गोमंतकीयांना अयोध्या यात्रा घडवणार: मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 07:50 AM2024-01-02T07:50:52+5:302024-01-02T07:51:40+5:30
श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे देव रुद्रेश्वराला आमंत्रण.
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर श्रीराम मंदिर साकारले असून अयोध्येत होणाऱ्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी गावातील प्रमुख मंदिरात एकत्र येऊन व्हर्चुअल पद्धतीने सोहळ्यात सामील व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. गोमंतकीय जनतेला अयोध्येची यात्रा घडवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दि. २२ जानेवारीला अयोध्यामध्ये होणाऱ्या प्रभू श्री रामचंद्रांची प्रतिष्ठापना निमंत्रण पत्रिका मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याहस्ते शेकडो भाविकांच्या उपस्थितीत हरवळे येथील रुद्रेश्वर देवस्थान येथे देण्यात आली. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी आरती केली. यावेळी उपस्थित भाविकांनी श्रीरामाचा जयजयकार केला.
अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते सफल करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हजारो भाविकांनी केलेले परिश्रम, दिलेले बलिदान सार्थकी लागले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी गावागावात एकत्र येऊन मुख्य मंदिरात उत्सव साजरा करा, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले. अयोध्येत गोमंतकीय भाविकांना दर्शन घेण्यासाठी आम्ही विशेष यात्राही आयोजित करू, असेही त्यांनी सांगितले. गावागावांत लोकांनी एकत्र यावे. सकाळपासून जप, साधना करावी व सोहळा सुरू होताच त्याचे साक्षीदार बनावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी देवस्थान समिती, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते, भाविक उपस्थित होते.
काहींनी थट्टा केलेली
१९९१ रोजी प्रभू श्रीरामाच्या पादुका तसेच शिळा पूजनाची आठवण ताजी करताना आपल्या गावात मंदिरात पालखीत सजलेल्या व भाविकांच्या उपस्थितीत पूजा-अर्चा करून मनोभावे सेवा केल्याची आठवण मुख्यमंत्र्यांनी सांगितली. त्यावेळी काही लोक आमची थट्टा करत होते हेही त्यांनी सांगितले.