गोव्यात आता आयुर्वेदिक पर्यटनही; जागतिक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

By किशोर कुबल | Published: December 8, 2022 06:22 PM2022-12-08T18:22:39+5:302022-12-08T18:23:12+5:30

नऊव्या जागतिक आयुर्वेद काँग्रेस आणि आरोग्य एक्स्पोचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

Ayurvedic tourism in Goa now; Chief Minister's Statement at the Inauguration of the World Conference | गोव्यात आता आयुर्वेदिक पर्यटनही; जागतिक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

गोव्यात आता आयुर्वेदिक पर्यटनही; जागतिक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

Next

पणजी: धारगळ येथे आॅल इंडिया इन्स्टिटयुट आॅफ आयुर्वेद संस्थेच्या येऊ घातलेल्या सुविधा राज्यात आयुर्वेदिक पर्यटनाला प्रोत्साहन देईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. गोवा सरकारने राज्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आयुष विभाग स्थापन करुन तेथे सरकारने आयुष डॉक्टर्स नेमलेले आहेत. धारगळ येथील आॅल इंडिया आयुर्वेद महाविद्यालयात ५० टक्के जागा केंद्राने गोव्यासाठी राखीव ठेवलेल्या आहेत, असे ते म्हणाले.

नऊव्या जागतिक आयुर्वेद काँग्रेस आणि आरोग्य एक्स्पोचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. चार दिवस ही परिषद चालणार आहे. या प्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे इतर राज्यांचे मंत्री तसेच आयुष मंत्रालयाचे सचिव  वैद्य राजेश कोटेचा उपस्थित होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, 'मोदीजींनी आयुर्वेदाला पुन्हा एकदा चांगले दिवस आणले आहेत. मोदीजींची हर दिन हर घर आयुर्वेद,संकल्पना आम्ही पुढे नेत आहोत.'

केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की, आयुर्वेद जगभरात पोहचविण्यासाठी जागतिक आयुर्वेद काँग्रेसने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. देशात आज आयुर्वेद भक्कम पायावर उभा आहे याचे श्रेय वैद्यांना द्यावे लागेल, ज्यांनी आपले पूर्ण जीवन वैद्य परंपरेला वाहिले. गोव्यातही पुरातन काळापासुन आयुर्वेद औषधे उपयोगात आणण्याची परंपरा आहे.'

आयुष मंत्रालयाचे सचिव  वैद्य राजेश कोटेचा यांनी नमूद केले की गेल्या आठ वर्षांमध्ये आयुष क्षेत्राने प्रचंड वाढ नोंदवली आहे. ते म्हणाले की २0२२ अखेरपर्यंत आयुष क्षेत्र १0 अब्ज डॉलर्सवर पोहोचेल. यावेळी भारतीय पारंपरिक वैद्यकीय प्रणालीमधील प्रगत अभ्यासाला सहाय्य करण्यासाठी, अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (एआयआयए) आणि जर्मनीच्या रोझेंबर्ग  युरोपियन अकादमी आॅफ आयुर्वेद यांच्यात एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

जगभरातील ६0 देशांमधून सुमारे ५ हजार चिकित्सक, पारंपारिक उपचार करणारे वैद्य, औषधी उत्पादक, शिक्षणतज्ञ, विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ११ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी समारोपाला उपस्थित असतील. आयुर्वेद एक्स्पोमध्ये स्टॉल्स उभारण्यात आले असून यात देशासह परदेशातील उत्पादक देखील सहभागी झाले आहेत. उद्घाटनाच्यावेळी सुमारे ६00 हून अधिक प्रतिनिधी परिषदेला उपस्थित होते. यात विद्यार्थ्यांचाही सहभाग होता. 

कला अकादमी संकूल, बांदोडकर स्टेडियम, साग स्टेडियम, आयनॉक्स कोर्टयार्ड, एनआयओ सभागृहात पुढील चार दिवस चर्चासत्रे होतील. आयुर्वेद तज्ञांची व्याख्याने, औषधी वनस्पतीवर चर्चासत्रे, आयुष क्लिनिक्स, सॅटॅलाइट कार्यशाळा आदी कार्यक्रम होतील या चार दिवस सुरू राहणाºया या परिषदेच्यावेळी आयुर्वेद ओपीडी सुरू राहणार असून यामध्ये मोफत चिकित्सा आणि उपचार केले जाणार आहेत.

Web Title: Ayurvedic tourism in Goa now; Chief Minister's Statement at the Inauguration of the World Conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा